
Sharad Pawar: "उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द शरद पवारांनी समोर आणलाय"
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या आत्मचरित्र प्रकाशनवेळी जाहीर केलेल्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर शरद पवार यांचे 'लोक माझे सांगाती' हे आत्मचरित्र ही चांगलंच चर्चेत आलं आहे. या पुस्तकाचा आता दुसरा भाग प्रकाशित झाला.
याच कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तर पवारांनी आत्मचरित्रातून अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. महाविकास आघाडी आणि शिवसेनेबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
शरद पवार यांनी लिहलेल्या या घटनेवरून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय" असं म्हणत चित्रा वाघ यांनी खोचक टीका केली आहे. तसेच "मतांसाठी राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंची पवार साहेबांनी बोलती बंद केली, हे बरं झालं" असंही वाघ यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विटमद्धे काय म्हंटलं आहे?
"मुंबई तोडण्याचा केंद्राचा कोणताही मानस नसल्याचं शरद पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहलंय….उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय. मुंबई तोडण्याची भीती दाखवून वर्षानुवर्षे #BMC लुटण्याचं काम केलं गेलंय. मतांसाठी राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंची पवार साहेबांनी बोलती बंद केली, हे बरं झालं" असं चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे.
शरद पवार यांनी लिहलेल्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रामध्ये अनेक विषयांवर लिहल आहे. महाविकास आघाडी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी, उद्धव ठाकरे अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.