
Ajit Pawar: '१६ आमदार अपात्र ठरणार नाहीत', पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'निर्णय विधानसभा...'
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. त्यामुळे या १६ आमदारांबाबत नार्वेकर काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
'शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार नाहीत. संबंधित १६ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकारला कसलाही धोका नाही', असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “मी यावर काहीही बोलू शकत नाही. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे यावर सुनावणी होणार आहे. याबाबत जो काही निर्णय द्यायचा आहे, तो निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “पण एक अभ्यासक, एक वकील आणि २५ वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला आता समजलं आहे की, पोपट मेला आहे. तरीदेखील तो मान हलवत नाही. तो हातपाय हलवत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलत आहेत. अशा गोष्टी बोलणं त्यांना सहाजिकच आहे. कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवावं लागतं की, आशा जिवंत आहेत,” अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.