
Aditya Thackrey: 'शिल्लक सेनेत आदित्य सरपंच तरी होईल का?' भाजप नेत्याची खोचक टीका
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. 'भावी मुख्यमंत्री’ आदित्य ठाकरे यांचे ठाकरे गटाच्या नेत्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणुन उल्लेख असणारे बॅनर लावले होते. त्यावरून नितेश राणे यांनी टीका केली आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का? हा विचार करून बॅनर लावावेत, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखवण्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंदिरात जाऊन महाआरती केली. या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नितेश राणेंच्या दौऱ्या पूर्वी त्रंबकेश्वरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. तिथे बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर दिसून आले. त्यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर लागल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नागपूरमध्ये पोस्टर्सवर आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या तर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं होतं.
नागपूरमधील रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला होता.