Video : संभाजी राजे यांना मदत ही भीक का वाटावी?: तावडे

vinod tawde commentary on sambhaji raje
vinod tawde commentary on sambhaji raje

मुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी? असा प्रश्न भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विचारला आहे.

काही दिवसांपुर्वी विनोद तावडे यांनी रस्त्यावर लोकांकडे पैसे मागत मदत गोळा केली होती. यावर टीका करताना छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही, असे म्हटले होते.

तावडे म्हणाले, 'आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे? हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे. म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. गोर-गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले 3.50 लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले 24.50 लाख रुपये, अशी एकूण 28 लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हां सर्वांना माहीत आहे.'

'राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजी राजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे. आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते,' असेही तावडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com