esakal | ‘महाविकास’मुळे भाजपला एका जागेचे नुकसान?

बोलून बातमी शोधा

‘महाविकास’मुळे भाजपला एका जागेचे नुकसान?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने येत्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला एका जागचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

‘महाविकास’मुळे भाजपला एका जागेचे नुकसान?
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने येत्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला एका जागचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

येत्या मार्च महिन्यात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अपक्ष तसेच छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्यास सातव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्‍यता आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने आघाडीचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून जाऊ शकतात. सध्या भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. आघाडीने आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक आघाडी म्हणूनच लढवली जाईल. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्‍यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार आरामात निवडून येतील. शिल्लक मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहील. मात्र, अपक्ष आणि अन्य पक्षांचे आमदार सत्तेच्या बाजूने उभे राहत असल्याची उदाहरणे असल्याने ही मते आघाडीच्या पारड्यात पडू शकतात. त्यामुळे राज्यसभेसाठी निवडणूक झाल्यास सातव्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. मात्र, अलीकडच्या काळात राज्यसभेची निवडणूक टाळण्यासाठी पक्षांचा कल राहिला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचेही प्रयत्न दोन्ही बाजूने होऊ शकतात.आमदारांच्या मतदानाद्वारे राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात सदस्यांची मुदत २ एप्रिल रोजी संपत आहे.

राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य
राष्ट्रवादी कॉंग्रेस : शरद पवार, ॲड. माजिद मेमन, कॉंग्रेस : हुसेन दलवाई, शिवसेना : राजकुमार धूत, भाजप : अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार : संजय काकडे

विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ
भाजप105   शिवसेना56   राष्ट्रवादी54   कॉंग्रेस44   बविआ3   सप2   एमआयएम2
प्र.जनशक्ति2   मनसे1   सीपीआयएम1   स्वाभिमानी1   रासप1   जनसुराज्य1   क्रांशेप1
अपक्ष १३