esakal | पवारांकडून शुभेच्छा आल्या पण मुख्यमंत्र्यांकडून नाही - नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

'शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री ठाकरेंचं मन मोठं नाही'

'शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री ठाकरेंचं मन मोठं नाही'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला आहे. गुरुवारी नारायण राणे यांनी पदभार स्वीकारलाय. यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही' अशी टिप्पणी नारायण राणे यांनी केली आहे.

"शरद पवार यांनी मला फोन केला. पवार मला म्हणाले की चांगले काम करा पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मला अद्याप शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचे मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही पण महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या. त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो", अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

हेही वाचा: मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेनिहाय मंत्र्यांची यादी

नारायण राणे यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानले. देशाचा जीडीपी कसा वाढेल तसंच देशातील तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी काय करता येईल, याचा मी विचार करेन, असं पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी कोणत्याही क्षणी भाजप-शिवसेना युती होईल, अशी चर्चा होती. मात्र नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देत यावर पुर्णविराम देण्यात आला आहे. शिवसेना-भाजप युती होणार नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलासा मिळाला असेल. कोकणात आणि मुंबईमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी राणे यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हेही वाचा: राणेंना मंत्रिमंडळात स्थान; शिवसेनेनं दिलं थेट आव्हान

संजय राऊतांना राणेंचे रोखठोक उत्तर

"नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी विविध कालखंडात अनेक मंत्रिपदे भुषवली आहेत. नारायण राणे यांची राजकीय उंची पाहता त्यांना तितकं महत्त्वाचं खातं मिळालेलं नाही. त्यांना (नावाप्रमाणेच) सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे. पण तरीही त्यांनी देशाचा आणि राज्याच्या विकासासाठी काम करावे ही अपेक्षा", असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर राणे म्हणाले, "केंद्रीय मंत्रिपद ही मोठी जबाबदारी आहे. हे खातं महत्त्वाचं आहे. कोणतंही खातं हे छोटं किंवा मोठं नसतं... मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि मी जेंव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे!!"

loading image