अनिल गोटेंना सरकार, भाजपची नोटीस - बापट

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 एप्रिल 2017

मुंबई - "समज देऊनही विधान परिषद रद्द करा,' असे म्हणणाऱ्या भाजपचे आमदार अनिल गोटे प्रकरणावरून विधान परिषदेत शनिवारीही विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, या वक्तव्याप्रकरणी गोटे यांना राज्य सरकार आणि भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी दिली.

मुंबई - "समज देऊनही विधान परिषद रद्द करा,' असे म्हणणाऱ्या भाजपचे आमदार अनिल गोटे प्रकरणावरून विधान परिषदेत शनिवारीही विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, या वक्तव्याप्रकरणी गोटे यांना राज्य सरकार आणि भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य हेमंत टकले यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

टकले म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही आमदार गोटे भूमिकेवर ठाम आहेत. विधान परिषदेच्या अस्तित्वावर ते वारंवार प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. परिषदेच्या सदस्यांमध्ये अस्वस्थता असून, आमची गरज आहे की नाही, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे सभापतींनी आमदार गोटेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणावा, अशी विनंती आहे.'' शिवसेनेचे अनिल परब म्हणाले की, गोटे यांच्याकडून आपल्या आदेशांचेही पालन होत नसल्याचे दिसून येते. अशा व्यक्तींना कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे.

गिरीश बापट म्हणाले, 'गोटे यांच्या वक्तव्यामागे कुणीतरी असल्याची शंका उपस्थित केली जाते; मात्र मुख्यमंत्र्यांनी गोटे यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. गोटे यांच्याकडून वारंवार केले जाणारे असे विधान योग्य नाही. त्यामुळे संसदीय कामकाजमंत्री म्हणून मी स्वतः त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच भाजपचे सदस्य म्हणूनही प्रदेशाध्यक्षांनीही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसात त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य सुनील तटकरे म्हणाले, की सरकारने आम्हाला "एप्रिल फूल' करू नये. सभापतींनी यासंदर्भातला निर्णय घ्यावा. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बुधवारी (ता. 5) याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने या विषयावर तूर्त पडदा पडला.

Web Title: bjp notice to anil gote government