भाजपकडून मित्रांना चुचकारायचे धोरण

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

‘शतप्रतिशत’चे उद्दिष्ट नाही?
हा सुवर्णकाळ नाही, असे सांगतानाच केंद्रात २०१९ मध्ये एनडीएचे सरकार येण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी तन, मन आणि धन अर्पून काम करावे, असे आवाहन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले. २०१४ मध्ये भाजपने ‘शतप्रतिशत भाजप’ आणि ‘मिशन २७२ प्लस’ हे टार्गेट ठेवले होते. या महामेळाव्यात मात्र असे कोणतेच उद्दिष्ट भाजप नेतृत्वाने ठेवलेले नाही. 

मुंबई - देशभरात झपाट्याने बदलत असलेल्या राजकीय वातावरणाचा अंदाज आल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना चुचकारायचे धोरण भाजपने स्वीकारले असल्याचे चित्र पक्षाच्या महामेळाव्यात दिसले. 

लोकसभेसाठी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर देशात एनडीएची स्पष्ट बहुमताने सत्ता आली; मात्र नंतरच्या चार वर्षांच्या काळात घटक पक्षांना फारसे महत्त्व न देण्याचे धोरण भाजपने स्वीकारले. दरम्यानच्या काळात अनेक राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे देशातील वातावरण झपाट्याने बदलत असल्याची जाणीव भाजपच्या चाणक्‍यांना झाली आहे.  

भाजपचे २०१९ मध्ये स्वबळावर सरकार येणे जवळपास अशक्‍य असल्याचे भाजपमधील जाणकारांना वाटत आहे. परिणामी, घटक पक्षांना तोडून चालणार नाही. त्यामुळे शिवसेनेसारख्या घटक पक्षावर टीका करणेही भाजपच्या नेत्यांनी टाळले आहे.

‘शतप्रतिशत’चे उद्दिष्ट नाही?
हा सुवर्णकाळ नाही, असे सांगतानाच केंद्रात २०१९ मध्ये एनडीएचे सरकार येण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी तन, मन आणि धन अर्पून काम करावे, असे आवाहन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले. २०१४ मध्ये भाजपने ‘शतप्रतिशत भाजप’ आणि ‘मिशन २७२ प्लस’ हे टार्गेट ठेवले होते. या महामेळाव्यात मात्र असे कोणतेच उद्दिष्ट भाजप नेतृत्वाने ठेवलेले नाही. 

गृहीत न धरण्याची शिवसेनेची भूमिका
भाजपने महाराष्ट्रात एनडीए सरकार येईल, अशी सामोपचारी भूमिका घेतली असली तरी, शिवसेनेने मात्र आम्हाला गृहीत धरू नका, असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला स्वत:समवेत ठेवायचा भाजपचा विचार आहे. बेरजेच्या राजकारणासाठी भाजपला शिवसेनेला समवेत ठेवायचे आहे. मात्र, शिवसेनेने सध्या भाजप सरकारबद्दल असलेल्या नाराजीमुळे शांत राहायचे ठरवले आहे. पक्षासंबंधीच्या जनभावना लक्षात घेऊन पुढे काय करायचे ते ठरवावे, असे निश्‍चित झाले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, ‘आम्हाला गृहीत धरू नका,’ असे सूचित केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. भाजपबाबत नेमके काय करायचे, त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यास अद्याप वेळ आहे, असे सांगितले जाते. भाजपशी युती करायची असेल तर त्यासंबंधीचा निर्णय आगामी काळात घेतला जाईल. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय घेण्यात येईल, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: bjp policy mahamelva in mumbai