Vidhan Sabha  2019 : ‘कमळ’ चिन्हाचा आग्रह अन् मुस्कटदाबी

Vidhan Sabha  2019 : ‘कमळ’ चिन्हाचा आग्रह अन् मुस्कटदाबी

विधानसभा 2019 
मुंबई - घटकपक्षांनी कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी भाजपने दबाव टाकल्याने घटकपक्षांची मुस्कटदाबी सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भाजपने अद्याप घटकपक्षाला एकही जागा सोडलेली नाही.

भाजप-शिवसेनेची युती झाली असून, भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागा लढवत आहे. घटकपक्ष भाजपचे आहेत, त्यामुळे भाजपनेच घटकपक्षांना जागा सोडाव्यात, असे सुरवातीपासून शिवसेनेचे म्हणणे आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं आठवले गट, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आणि विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना हे भाजपचे घटकपक्ष आहेत. घटकपक्षांना १८ जागा सोडणार, असे भाजपने चित्र रंगवले आहे. मात्र, अद्याप घटकपक्षांना भाजपने एकही जागा सोडली नाही. 

रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहा जागा रिपाइंला मिळाल्या, असे जाहीर केले आहे. तसेच, उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र हे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी भाजपचा आग्रह आहे, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे सर्व उमेदवार भाजपचेच राहणार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघात रिपाइंचा उमेदवार ठरवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विजयसिंह मोहिते पाटील करणार असल्याचे आठवले यांनी जाहीर केले आहे. आठवले यांच्याप्रमाणेच शिवसंग्राम संघटनेची अवस्था आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विनायक मेटे बीड विधानसभा मतदारसंघातून लढले होते ती जागा शिवसेनेला सुटली आहे, तर मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर मेटे यांच्या उमेदवार म्हणून भारती लव्हेकर या विजयी झाल्या होत्या, अद्याप त्यांचे नाव जाहीर झाले नाही. यादेखील तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या आमदार आहेत. तर, राष्ट्रीय समाज पक्षाला अद्याप एकही जागा जाहीर झाली नाही. जानकर हेदेखील स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, त्यांच्या पक्षादेखील उमेदवारी जाहीर झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com