वाचाळवीरांना भाजपचा डच्चू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भाजपची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. नव्या कार्यकारिणीतून वाचाळवीर प्रवक्‍त्यांना डच्चू देण्यात आला आहे. आमदार राम कदम, अवधूत वाघ यांना प्रवक्‍तेपदावरून दूर केले आहे. तर, ज्येष्ठ नेत्या कांताताई नलावडे यांनी स्वतःहून कळविल्यामुळे त्यांचीही पाटील यांनी प्रवक्‍तेपदाची जबाबदारी कमी केली आहे.

राम कदम, अवधूत वाघांची नव्या कार्यकारिणीतून गच्छंती
मुंबई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भाजपची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. नव्या कार्यकारिणीतून वाचाळवीर प्रवक्‍त्यांना डच्चू देण्यात आला आहे. आमदार राम कदम, अवधूत वाघ यांना प्रवक्‍तेपदावरून दूर केले आहे. तर, ज्येष्ठ नेत्या कांताताई नलावडे यांनी स्वतःहून कळविल्यामुळे त्यांचीही पाटील यांनी प्रवक्‍तेपदाची जबाबदारी कमी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कदम आणि वाघ यांना दूर केल्याचे समजते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपमध्ये प्रवेश करून आमदार झालेले राम कदम यांनी महिलांविषयी अनुचित उद्‌गार काढल्यामुळे त्यांच्याविरोधात विरोधी पक्षाचा रोष आहे. त्यामुळे वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत भाजपच्या वतीने भूमिका मांडताना कदम यांना पडते घ्यावे लागत आहे. विनाकाकरण आणखी वाद नको म्हणून कदम यांना डच्चू देण्यात आल्याचे समजते.

कदम यांच्याप्रमाणेच अवधूत वाघ यांनीदेखील वादग्रस्त विधाने केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार आहेत, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे वाघ यांना अनेकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत यांच्याकडून आणखी काही वादग्रस्त विधाने केली जाऊ नयेत, याची खबरदारी घेताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांना प्रवक्‍तेपदावरून हटविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Ram Kadam Avadhoot Wagh Politics