राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपर्यंत भाजपचे 'आस्ते कदम'

- प्रशांत बारसिंग
गुरुवार, 2 मार्च 2017

शिवसेनेच्या साथीची गरज; अन्य राज्यांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी

शिवसेनेच्या साथीची गरज; अन्य राज्यांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी
मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत देशातील सर्वांत मोठ्या उत्तर प्रदेश, बिहार आणि तमिळनाडू राज्याचा भाजपला पाठिंबा मिळण्याची शक्‍यता नसल्याने महाराष्ट्रात शिवसेनेला चुचकारण्याशिवाय भाजपसमोर पर्याय नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे फुटीच्या उंबरठ्यावर आलेल्या परिस्थितीतीतही शिवसेनेसोबत "आस्ते कदम' घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिववसेना - भाजपची युती संपुष्टात आल्यापासून दोन्ही पक्षांतून विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडले होते. राज्यातील सरकारमधून बाहेर पडण्याच्या घोषणाही शिवसेना नेत्यांनी या वेळी दिल्याने राज्य सरकारच्या स्थिरतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र मुंबईसह अन्य महापालिका आणि जिल्ह ापरिषदांमध्ये सत्ता स्थापना करण्यास काही दिवसांचा अवधी असताना दोन्हीकडील नेत्यांनी वादग्रस्त विधाने करणे टाळले आहे. यामागे शिवसेनेला सत्तेत राहून भाजपला डिवचायचे असून, भाजपच्या दृष्टीने जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची मदत हवी आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. 28) दिल्लीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीत शिवसेनेसोबत जुळवून घेण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त प्रसिद्घ झाले आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचा राज्याच्या सत्तेत समावेश करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही पक्ष भाऊ असल्याची विधाने केली आहेत.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी राज्याची लोकसंख्या आणि आमदारांच्या संख्येवर प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य ठरलेले आहे. देशात सर्वाधिक मूल्य असलेल्या उत्तर प्रदेशाचा सर्वांत वरचा क्रमांक लागत असून, तमिळनाडू दुसरा, तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रापाठोपाठ बिहार राज्यातील आमदारांचे मूल्य आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फारसे यश मिळणार नसल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्या खालोखाल बिहार आणि तमिळनाडूदेखील भाजपला मदत करणार नसल्याचे राजकीय चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेनेचा भाजपला मोठा हातभार लागण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेच्या राज्याच्या विधानसभेत 63 आमदार, लोकसभेत 18, तर राज्यसभेत तीन खासदारांची कुमक आहे. ही मते मिळण्यासाठी शिवसेनेबाबत "आस्ते कदम' घेण्याशिवाय भाजपसमोर पर्याय नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी तांत्रिक माहिती
- प्रत्येक आमदाराच्या मतांचे मूल्य असलेली राज्ये

- उत्तर प्रदेश - 208, तमिळनाडू - 176, महाराष्ट्र - 175 आणि बिहार - 173
- प्रत्येक खासदाराचे मूल्य - 708
- देशभरातील विधानसभा आमदार - 4120
- लोकसभा-राज्यसभा खासदार - 776
- 30 राज्यांतील मतांचे एकूण मूल्य - 5 लाख 49 हजार 474
- एका खासदाराचे मूल्य - 708
- एकूण खासदारांचे मूल्य - 5 लाख 49 हजार 408
- सर्व मतांचे एकूण मूल्य - 10 लाख 98 हजार 882

Web Title: bjp relax to president election