विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्यास भाजप-शिंदेंना फटका बसणार? - Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics : विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्यास भाजप-शिंदेंना फटका बसणार?

महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा-लोकसभा २०२४ निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मात्र आज 'द हिंदू'च्या बातमीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शिंदे गट आणि भाजपचे देखील टेन्शन वाढले आहे. 

लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार असल्याचे वृत्त  'द हिंदू'ने दिले आहे. पुढील वर्षी ‘एप्रिल-मे’मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबत विधानसभा निवडणुकही घेण्याचा प्रस्ताव भाजपने दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचा पराभव अटळ ?

विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्यास भाजप आणि शिंदेंना फटका बसणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास भाजपचा पराभव अटळ आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. मोदींची लहर आता संपली आहे. मोदींबाबत लोकांमध्ये प्रचंड राग आहे. त्यांनी लोकांना फसवले आहे. घोषणा करुन त्याची पुर्तता केली नाही. जे होते ते त्यांनी विकून टाकले. त्यामुळे शेतकरी, छोटा व्यापारी यांच्या मनात प्रचंड राग आहे. तसेच जर निवडणुका एकत्र झाल्यास आम्हाला त्याचा फायदा होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

शिंदे गटाचे काय होणार?

निवडणुका एकत्र झाल्यास याचा महाविकास आघाडीला मोठा फायदा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे गट अजून स्वत:च अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धावपळ सुरू आहे. शिवसेना पक्ष, चिन्ह मिळाले तरी त्यांनी आम्हीच शिवसेना हे सतत सांगावे लागत आहे.

मुख्यमंत्री पदावरून झालेल्या गोंधळामुळे देखील युतीत वर्चस्ववाद पाहायला मिळतो. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपासंदर्भात केलेल्या विधानामुळे हे दिसून आले. तसेच उद्धव ठाकरे यांना लोकांमधून मोठी सहानुभूती मिळत आहे. कसबा पोटनिवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. खेडमधील उद्धव ठाकरेंच्या सभेला देखील मोठा प्रतिसाद मिळाला होता. 

भाजपने केले वृत्ताचे खंडन - 

कोणताही प्रस्ताव राज्याच्या कार्यकारिणीने केंद्राकडे पाठवला नाही. लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. विधानसभेची कुठलीही तयारी आम्ही सुरू केली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, अशी कुठलीही शक्यता नाही. जाणीपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहेत.