मतभेद, मनभेद आणि आता बुद्धिभेद 

संजय मिस्कीन- सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - सत्तेसाठी प्रतिस्पर्ध्याचे उट्टे काढताना वाटेल तसे आरोप करण्याची प्रथा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने रूढ होत असल्याचे चित्र असून, शिवसेना व भाजपमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी तणावपूर्ण प्रचाराची पातळी "खोला'वल्याचे मात्र स्पष्ट आहे. 

मुंबई - सत्तेसाठी प्रतिस्पर्ध्याचे उट्टे काढताना वाटेल तसे आरोप करण्याची प्रथा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने रूढ होत असल्याचे चित्र असून, शिवसेना व भाजपमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी तणावपूर्ण प्रचाराची पातळी "खोला'वल्याचे मात्र स्पष्ट आहे. 

भाजप-शिवसेना नेत्यांची प्रचारातली भाषा, आरोप-प्रत्यारोप आणि व्यक्तिगत टीकाटिप्पणीने युतीचा प्रवास मतभेदानंतर मनभेदाकडे जात असतानाच आता बुद्धिभेदाची "कल्हई'देखील देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची खंत व्यक्‍त होत आहे. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचे आरोप म्हणजे निवडणुकीच्या आखाड्यातला "राजकीय विनोद' असल्याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांतून व्यक्‍त केली जात आहे. 

भाजप-शिवसेनेची युती तोडण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजप म्हणजे "जलिकट्टू'चा उधळलेला बैल असल्याची तुलना केली. त्यावर भाजपने शिवसेनेला महाभारतातल्या कौरवांची उपमा दिली. यानंतर भाजपचे नेते खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र सतत उद्धव ठाकरे व कुटुंबीयांचा संदर्भ देत कथित गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्याचे सूतोवाच केले. युतीतला हा मतभेदाचा प्रचार मनभेद करणार असे वाटत असतानाच मुख्यमंत्र्यांना "अर्धवटराव' अशी उपमा देत उद्धव ठाकरे यांनी पारदर्शकतेचा केंद्राचा अहवाल जनतेच्या समोर मांडला. पारदर्शकतेची कास धरून प्रचाराची रणनीती आखणाऱ्या भाजपची मात्र यामुळे अडचण झाली आणि युतीच्या नेत्यांतील मनभेद अधिकच गडद होऊ लागले. 

आता किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप करत काही कंपन्यांमध्ये "मनिलॉड्रिंग' झाल्याचा आरोप केला. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत सोमय्या यांचा हा पवित्रा म्हणजे ठाकरे कुटुंबीयांना "ईडी'च्या जाळ्यात अडकवण्याचाच असल्याची शिवसैनिकांची भावना झाली आहे. हा आरोपच सिद्ध झाला नसला, तरी ऐन प्रचारात तो झाल्याने हा बुद्धिभेद करण्याचा प्रकार असल्याचे शिवसेनेसोबतच इतर पक्षातंल्या काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांना वाटते. सोमय्या यांचा आरोप गंभीर असल्याने कोणत्याही क्षणी ठाकरे यांच्यावर "ईडी'ची कारवाई होऊ शकते, असा दावा भाजपमधील नेते करत असल्याने प्रचारातला तणाव शिगेला पोचेल, अशी भीती व्यक्‍त होत आहे. 

...हा तर मोठा "विनोद' 
कॉंग्रेसने शिवसेनेला "व्हॅलेंटाइन'ची भेट म्हणून 40 जागा दिल्या, तर शिवसेनेने कॉंग्रेसला दहा जागा दिल्या, असा आरोप भाजप नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद केला. तावडे यांचा हा आरोप म्हणजे आतापर्यंतचा मोठा "विनोद' असल्याची टीका कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. हा बुद्धिभेद करण्याचा प्रकार असून, भाजप असा बुद्धिभेद करण्यात पटाईत असल्याचे निरुपम म्हणाले.

Web Title: bjp & shiv sena confusion