Vidhan Sabha 2019 : भाजप-सेनेचे अखेर ठरले; आकडा मात्र गुलदस्त्यात

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

युती झाल्याचा निरोप भाजपतर्फे नीरज गुंडे यांनी आज (सोमवार) पहाटे तीन वाजता मातोश्रीवर पोहोचवला. १४४ जागा न मिळाल्याचे सेनेला शल्य आहे तर सेनेकडे ताकद नसताना त्यांना १२४ ते १२६ जागा द्याव्या लागल्या याची भाजपला खंत आहे.पण अखेर युती झाली.

मुंबई : बेलापूर, कागल, माण आणि पिंपरी या जागांबाबत सेना भाजपमधील मतभेद कायम राहिल्याने जागा आकडे या घोळात न जाता आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचा भाजपने सुचवलेला पर्याय शिवसेनेने रात्री उशीरा मान्य केला आहे. १२६ जागा शिवाय बेलापूर माण हा आग्रह सेनेने शेवटपर्यंत न सोडल्याने अखेर सच्च्या मित्रांनी आकड्यात शिरायचेच का असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

समसमान जागांचे आश्वासन भाजपने पाळले नाही हे चित्र सेनेसाठी अडचणीचे ठरेल अशी कैफियत सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. तिची दखल घेत संयुक्त पत्रकार परिषद नंतर घेवू आता एक पत्रक जारी करू असे ठरले. युतीत आपल्याला मान नाही अशी तीव्र प्रतिक्रीया आज पक्षप्रमुख उद्धव यांनी सेनेच्या मंत्र्यांसमोर मांडली. मात्र युतीतच भले असल्याचे या नेत्यांचे मत होते. अखेर स्वपक्षातील मत लक्षात घेत उद्धवजींनी युतीवर शिक्कामोर्तब केले. रात्री मोदी शहा फडणवीस पाटील यांच्यात बोलणी सुरु होती. सेनेच्या आग्रहानंतर आता पुढचा मार्ग काय भाजपच्या जागा युतीत लढताना कशा वाढणार यावर लक्ष दिले जाणार आहे. चार ते आठ मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होण्याचीही शक्यता आहे.

युती झाल्याचा निरोप भाजपतर्फे नीरज गुंडे यांनी आज (सोमवार) पहाटे तीन वाजता मातोश्रीवर पोहोचवला. १४४ जागा न मिळाल्याचे सेनेला शल्य आहे तर सेनेकडे ताकद नसताना त्यांना १२४ ते १२६ जागा द्याव्या लागल्या याची भाजपला खंत आहे.पण अखेर युती झाली.

१२४ की १२६ हा निर्णय भाजपवर सोडून देण्यास अखेर सेना राजी झाली आहे. १२४ मतदारसंघांवर थांबावे लागल्यास सेनेला विधानपरिषदेच्या दोन जागा दिल्या जातील असेही सुत्रांनी स्पष्ट केले. बेलापूर मतदारसंघ मंदा म्हात्रे यांनाच देण्याचा निर्णय मान्य करून घेतल्यावर ठाणे जिल्ह्यातील एक जागा भाजप सेनेला देणार असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Shivsena alliance finalize for Maharashtra Vidhan Sabha 2019