Vidhan Sabha 2019 : राज्यात महायुतीच्या 220 ते 240 जागा निवडून येतील : मुख्यमंत्री

Vidhan Sabha 2019 : राज्यात महायुतीच्या 220 ते 240 जागा निवडून येतील : मुख्यमंत्री

उल्हासनगर : समोर लढण्यासाठी विरोधी पक्षच नसल्याने ही एकतर्फी लढाई असून, महाराष्ट्रात महायुतीच्या 220 ते 240 जागा निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच 15 वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जी कामं केली. त्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही या 5 वर्षांत केली आहे, असेही ते म्हणाले.

उल्हासनगर येथील गोल मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुळीच दम राहिलेला नाही. कारण आमच्या विरोधात लढणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत झालेला आहे. शाळेतील लहान मुलेसुद्धा सांगतील की यंदा भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर येणार अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षांची खिल्ली उडवली. 

तसेच ते पुढे म्हणाले, इथे मेट्रो धावणार असून, स्थानकाचे नाव सिंधूनगर ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे. शहरातील इमारतींच्या पुनर्निर्माणासाठी 4 एफएसआय देण्यात येणार आहे. या शहरातील योजना-समस्या सोडवण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जास्त कामं केली

गेल्या 15 वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जी कामं केली. त्यांच्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही या 5 वर्षांत केली आहे. कामांचा हिशोब आमच्याकडे आहे. सरकारने शिक्षण, उद्योग, रोजगार या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून, रस्ते , पाणी, गरिबांना घरे या क्षेत्रात इतर राज्यांपेक्षा 25 पट जास्त प्रगती केली आहे. याशिवाय सरकारी शाळांचे डिजिटलायझेशन केल्यामुळे आता इंग्रजी माध्यमांची मुले सरकारी शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

महापौर कलानी, टीओकेच्या नगरसेवकांनी फिरवली पाठ

भाजपच्या महापौर पंचम कलानी यांनी तसेच बहुतांश टीम ओमी कलानी (टीओके) नगरसेवकांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ फिरवली. या टीम मधील स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी मात्र, उपस्थिती दर्शवली.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, उल्हासनगरचे उमेदवार कुमार आयलानी, अंबरनाथचे उमेदवार डॉ. बालाजी किणिकर, मुरबाडचे उमेदवार किसन कथोरे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,गटनेते रमेश चव्हाण, साई पक्ष प्रमुख जीवन ईदनानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, माजी महापौर मिना आयलानी, नगरसेवक महेश सुखरामानी, मनोज लासी, डॉ. प्रकाश नाथानी, राजू जग्यासी आदि उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com