आता भाजप-शिवसेनेत रंगणार चहापानाचे नाट्य?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 मार्च 2017

शिवसेनेच्या उपस्थितीबाबत उत्सुकता शिगेला
मुंबई - राजधानी मुंबईचे महापौरपद शिवसेनेला बहाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी "पांढरे निशाण' फडकावले असले, तरी उद्या भाजप-शिवसेनेत चहापानाचे नाट्य रंगण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शिवसेना आक्रमक असताना याचे पडसाद उद्या (ता. 5) होणाऱ्या चहापान कार्यक्रमात उमटतील, अशी शक्‍यता आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सोमवार (ता. 6) पासून सुरू होत आहे. त्याअगोदर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्या सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी व विरोधकांच्या सोबत चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. भाजप व शिवसेना युतीतली रुंदावलेली दरी सांधण्याचा मुख्यमंत्र्यांनी आज प्रयत्न केला; मात्र शिवसेनेने मंत्रिमंडळातदेखील पारदर्शकता आणावी, यासाठी आग्रह धरलेला आहे.

त्यासोबतच शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणीही केली आहे. या दोन प्रमुख मागण्यांवरून शिवसेना मंत्री उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणता पवित्रा घेतात व चहापान कार्यक्रमात सहभागी होतात की नाही, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदा व महापालिकांत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल अधिवेशनात मुख्यमंत्री व भाजप आमदारांची बाजू वरचढ राहील, असे मानले जाते. त्यासोबतच विरोधी पक्षाकडेही राज्यातील कायदा व सुव्यवस्था, हत्या, बलात्काराच्या वाढत्या घटना व शिवसेना-भाजपने परस्परांवर केलेले आरोप असे स्फोटक मुद्दे आहेत.

याशिवाय, शेतकरी कर्जमाफीचा प्रश्‍नदेखील कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार आक्रमकपणे उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील.

मात्र, शिवसेना व भाजपमधील मुंबई महापालिकेतल्या कथित भ्रष्टाचारावरून उडालेला आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा या अधिवेशनातला कळीचा मुद्दा ठरेल, असे चित्र आहे.

Web Title: bjp-shivsena drama