भाजपाच्या व्होटबॅंकेवर सेनेची नजर

महेश पांचाळ - सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या गुजराती समाजाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु झाला असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून हक्काच्या मराठी मतांबरोबरच गुजराती मतांची गोळाबेरीज केली जात आहे.

मुंबई - नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या गुजराती समाजाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु झाला असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून हक्काच्या मराठी मतांबरोबरच गुजराती मतांची गोळाबेरीज केली जात आहे.

मुंबईतील गुजराती समाज हा भाजपाची 'व्होटबॅंक' म्हणून ओळखला जातो. या मतपेढीला धक्का देण्याची व्युहरचना शिवसेनेने आखली आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते हेमराज शाह, जयंतीभाई मोदी यांच्यासह भाजपाचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोषी यांच्यासह मोठ्या संख्येने गुजराती बांधवांनी शिवबंधन बांधून घेतले. येत्या काही दिवसात भाजपासह अन्य पक्षातील गुजराती पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्रस्त झालेल्या मुंबईकर गुजराती वर्गाला आकर्षित करण्याची सेनेची खेळी यशस्वी ठरली आहे. वीस दिवसापुर्वी गुजराती व्यापारी शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती.  गुजराती समाज मोठ्या प्रमाणावर मोदीच्या निर्णयावर नाराज असल्याची बाब त्यावेळी शिवसेनेच्या लक्षात आली. गुजराती समाज आपली भूमिका बोलून दाखवू शकत नाही, हे ओळखून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुजराती समाजातील प्रतिनिधींचे गाऱ्हाणे ऐकण्यावर भर दिला होता.

गुजराती समाजाची एकगठ्ठा मते भाजपाला मिळतात, असा मुंबईतील आजवरचा अनुभव आहे. गुजराती वस्ती असलेल्या ठिकाणी भाजपाचे  नगरसेवक आमदार हमखास निवडून आले आहेत. मराठी हक्काच्या मतांबरोबर सेनेने गुजराती भाषक भागात शिवसेनेला नुकसान होउ नये, यासाठी काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. जेथे मराठी उमेदवार निवडून येणार नाही तेथे अमराठी उमेदवार देण्याचा विचार सेनेच्या गोटात केला आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने गुजराती विभाग सुरु केला असून, भाजपासह अन्य पक्षांतील नाराज असलेल्यांना प्रवेश देवून भाजपाच्या हक्काच्या मतांना  धक्‍का देण्याची व्युहरचना सेनेने आखली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेलाही मुंबईसह महाराष्ट्रात फायदा झाला होता. परंतु, एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजपाकडून सत्तेत राहूनही शिवसेनेला दूर ठेवण्यात आल्याचा राग व्यक्त करताना शिवसेनेकडून गुजराती माणसांच्या मनोवृत्तीवर टिकाटिपण्णी सुरु करण्यात आली होती. 'मुंबईतून कमावले पण, मुंबईला काय दिले?', असा सवाल गुजराती समाजाला उद्देशून शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला होता. त्यानंतर गुजराती व्यापाऱ्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मात्र, केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका आता व्यापार उद्योगाला बसत असल्याने गुजराती व्यापारी वर्ग भाजपावर नाराज झाल्याचे बोलले जाते. ही नाराजी काही प्रमाणात शिवसेनेच्या मतांकडे वळविण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहेत.

मुंबईतील मुंबादेवी भुलेश्‍वर, मलबार हिल, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, चारकोप, घाटकोपर, मुलुंड या भागात गुजराती समाज मोठ्या प्रमाणावर राहातो. मुंबईत एकूण लोकसंख्येच्या 23 टक्‍के मराठी भाषक आहेत. त्याच्या खालोखाल 17 टक्‍के वस्ती गुजराती असून त्यांची लोकसंख्या सुमारे 35 लाख आहे. त्यातील 20 ते 22 लाख गुजराती मतदारांची संख्याही निर्णायक आहे. मुंबई महापालिकेत स्वबळावर लढविण्याची तयारी करणाऱ्या शिवसेनेने आता मराठीच्या मुद्याला बाजूला ठेवून विकास कामांवर भर देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी गुजराती वाद निर्माण होणे हे सेनेला परवडणारे नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

1993 च्या दंगली च्यावेळी कोण मदतीला होते, याची आठवण ठेवून गुजराती मतदारांनी शिवसेनेला साथ द्यावी, असे भावनिक आव्हान शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. नोटबंदीच्या 50 दिवसानंतर परिस्थिती चिघळली तर त्याचा फायदा घेत, काही प्रमाणात या समाजाला आपल्याकडे खेचता येईल, अशी सेनेची सध्याची रणनिती दिसते आहे.

Web Title: BJP-Shivsena politics in Mumbai