भाजपविरोधात आता आरपार लढाई

राजेश मोरे
रविवार, 3 जून 2018

ठाणे - गेली पंचवीस वर्षे लक्ष न दिलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतांपर्यंत मजल मारल्याने शिवसेनेतील चाणक्‍यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच राजकीय जाणकारांनी युतीचा कितीही होरा केला, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपशिवाय लढविण्याच्या मतावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अद्याप ठाम असल्याचे समजते. 

ठाणे - गेली पंचवीस वर्षे लक्ष न दिलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतांपर्यंत मजल मारल्याने शिवसेनेतील चाणक्‍यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच राजकीय जाणकारांनी युतीचा कितीही होरा केला, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपशिवाय लढविण्याच्या मतावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अद्याप ठाम असल्याचे समजते. 

त्यामुळेच, पालघरच्या पोटनिवडणुकीनंतर ‘मातोश्री’च्या गडावरून आरपारच्या लढाईचे खलिते जवळच्या शिलेदारांना धाडल्याचे कळते. पालघरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्या वेळी भाजपचे नेते आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाले होते. शिवसेनेने या मतदारसंघात विश्वासघात केल्याची भूमिका त्या वेळी मांडली गेली होती. पण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत युतीसाठी झुलवत ठेवून अचानक वेगळी चूल मांडलेल्या भाजपबद्दल शिवसेनेतील एका मोठ्या गटात अद्यापही नाराजी आहे. विशेष म्हणजे हा गट शिवसेनेत आक्रमक गट म्हणून ओळखला जातो. आताही लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला दूर सारले जाणार असल्याची भूमिका यापैकी बहुतांश नेत्यांनी ‘मातोश्री’वर मांडल्याचे कळते. 

भाजप सत्तेवर आल्यापासून केंद्र अथवा राज्यातील अनेक मोठ्या कार्यक्रमांत शिवसेनेला कायम दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली आहे. कधी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही, तर कधी ऐनवेळी निमंत्रण देऊन भाजपने वरचढपणा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अशावेळी अस्मितेच्या राजकारणावर चालणाऱ्या शिवसेनेतील नेत्यांच्या जिव्हारी ही बाब लागली आहे. त्यामुळे भाजपला लोकसभेच्या वेळी आपली गरज असल्याने लोकसभेसाठी कोणत्याही स्थितीत युती होऊ नये ही भूमिका उद्धव यांनी कायम ठेवल्याची माहिती शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्राने दिली. आजच्या घडीला शिवसेनेने भाजपला आपला क्रमांक एकचा राजकीय प्रतिस्पर्धी मानले आहे. 

पालघरच्या लढाईत उद्धव यांच्या आदेशानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अवघ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची फौज पालघरमध्ये उतरवली होती. पण, शहरी आणि ग्रामीण भागाची सरमिसळ असलेल्या या मतदारसंघात कमीतकमी वेळात सर्व मतदारांपर्यंत शिवसेनेचे धनुष्यबाण पोचविण्यात शिवसेनेची दमछाक झाली. त्यातही आदिवासी भागात धनुष्यबाण पोचविण्यात त्यांना विशेष मेहनत करावी लागली. मात्र, पंचवीस वर्षे लोकसभा म्हणून ज्या मतदारसंघात लक्ष दिले नव्हते, त्या मतदारसंघात तब्बल दोन लाख ४३ हजार मते मिळाल्याने शिवसैनिकांचा आणि त्याचबरोबर शिवसेना नेत्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे. याच आत्मविश्वासाच्या बळावर युतीबाबत कितीही चर्चा सुरू राहिली, तरी लोकसभेत युती करायची नाही, या मतावर उद्धव अद्याप ठाम असल्याचे कळते. एवढेच नव्हे, तर विधानसभेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसविण्यासाठी आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवसेनेने जिंकलेल्या जागा ताब्यात ठेवतानाच भाजप निवडून आलेल्या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांना आतापासूनच ताकद देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील दादरप्रमाणेच शिवसेनेत ठाणे शहराला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. ठाण्यातील विधानसभेचा पराभव विजयात बदलण्यासाठी येथील उमेदवार आतापासूनच निश्‍चित केल्याचे कळते. 

आता कोकणात आमनेसामने
पालघरनंतर भाजप आणि शिवसेना आता कोकण मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे आणि शिवसेनेचे माजी महापौर यांच्यात लढत होणार आहे. ही लढत पदवीधर मतदारसंघापुरती मर्यादित असली, तरी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील पदवीधर मतदान करणार आहेत. अशावेळी संजय मोरे यांना मैदानात उतरवून भाजपच्या विरोधात आपण कायम लढण्याच्या पवित्र्यात असल्याचा इशाराच उद्धव यांनी दिल्याचे मानले जात आहे.

आम्ही मर्द आहोत - नितीन गडकरी
शिवसेनेसोबत युती कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, त्यांचा विरोध कायम आहे. सर्व विरोधक एकत्र आले, तरी काही हरकत नाही. आम्ही मर्द आहोत. सर्वांशी लढण्याची आमची तयारी आहे.

Web Title: BJP Shivsena Politics Uddhav Thackeray