Vidhan Sabha 2019 : अपक्षांना घेऊन भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

BJP
BJP

राज्यात त्रिशंकू सरकार आले, की लहान पक्षांच्या, तसेच अपक्ष आमदारांना एकदम महत्त्व प्राप्त होते. गेल्या निवडणुकीत स्वबळावर निवडून आलेल्या सात आमदारांपैकी पाचजणांना यावेळी भाजपचे 'कमळ' हातात धरले आहे, तर अन्य दोघांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असली, तरी त्यांच्याविरुद्ध ईव्हीएमवर 'कमळ' ही निशाणी नाही.

राज्यातही गेल्या निवडणुकीत मोठ्या चार पक्षांचे आमदार वगळता अन्य लहान पक्षांचे व अपक्ष असे एकूण वीस आमदार निवडून आले. त्यामध्ये पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तिघेजण, रायगड व सोलापूर जिल्ह्यात शेकापचे तिघेजण निवडून आले. विधीमंडळात पहिल्यांदाच प्रवेश केलेल्या एमआयएम पक्षाचे दोघेजण मुंबई व औरंगाबाद शहरातून प्रतिनिधीत्व करीत आहेत. अन्य पाच सदस्यांमध्ये सप, मनसे, माकप, भारिप आणि रासप यांचा प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

भाजपचे 122 आणि मित्रपक्षाचा एक आमदार आल्यानंतर, निवडून आलेल्या अन्य अपक्ष आमदारांशी भाजपच्या नेतृत्वाने जुळवून घेतले. त्यामुळे, विधीमंडळ कामकाजात त्यांना साह्य झाले. गेल्या निवडणुकीत प्रमुख पाच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात असतानाही या अपक्ष उमेदवारांनी त्या सर्वांना पराभूत करीत मतदारसंघात विजयश्री संपादन केली होती.

अपक्षांसह सातजण भाजपच्या 'कमळा'वर
भाजपने या आमदारांनी केलेले सहकार्य लक्षात घेत पाचजणांना थेट उमेदवारीच बहाल केली. महेश लांडगे (भोसरी), गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), मोहन फड (पाथरी), विनायकराव जाधव पाटील (अहमदपूर) आणि शिरीष चौधरी (अमळनेर) हे ते पाच आमदार. अमरावती जिल्ह्यातील रवी राणा (बडनेरा) आणि बच्चू कडू (अचलपूर) या दोन अपक्ष आमदारांविरुद्ध भाजपने उमेदवार उभा न करता, जागा वाटपात त्या जागा शिवसेनेला सोडल्या आहेत. त्यामुळे, या दोघांची लढत शिवसेनेशी होत आहे.

भाजपने जरी या आमदारांना उमेदवारी दिली असली, तरी लांडगे वगळता, अन्य आमदारांना युतीतील कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. ठाणे जिल्ह्यात गणपत गायकवाड यांना उमेदवारी देण्यासाठी कल्याण पश्‍चिम हा भाजप आमदाराचा मतदारसंघ जागा वाटपात शिवसेनेला देण्यात आला. तेथे भाजप आमदाराने बंडखोरी केली, तर गायकवाड गेल्यावेळी शिवसेनेविरुद्ध केवळ सातशे मतांनी निवडून आले होते. तेथेही शिवसेनेने बंडखोरी केली आहे. मोहन फड यांनाही बंडखोरीचा त्रास होत आहे.

महादेव जानकर यांच्या रासपचे आमदार असलेले राहूल कूल, तसेच पेणमध्ये शेकापच्या आमदाराविरुद्ध चार हजार मतांनी पराभूत झालेले कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र पाटील हे दोघेजण भाजपतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

शिवसेनेच्या वाट्याला अवघड लढती
या सात जागा वगळता उर्वरीत तेरा जागांवर शिवसेनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले आहे. माकप, शेकाप, बहुजन विकास आघाडी, एमआयएम, सप, मनसे, भारिप, तसेच दोन अपक्ष आमदार हे बहुतेकवेळा युती सरकारच्या विरोधात होते. त्या जागा युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत.

मनसेचे आमदार शरद सोनवणे (जुन्नर) शिवसेनेत गेले असून, त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली, मात्र शिवसेनेच्या आशा बुचके यांनी त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली. गेल्या दोन निवडणुकांत बुचके शिवसेनेच्या उमेदवार होत्या. बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे (बोईसर) हेही शिवसेनेचे उमेदवार झाले आहेत.

गेल्या वेळी निवडून आलेल्या अन्य वीस आमदारांपैकी सोळाजण यंदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आता औरंगाबादचे खासदार झाले आहेत. शेकापकडून अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. शेकापने अलिबागला नवीन चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे, तर वंचित विकास आघाडीने बाळापूरच्या आमदाराऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी दिली.

गेल्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांचे उमेदवार नाकारणाऱ्या या वीस मतदारसंघात यावेळी काय होईल, ते मतदार ठरवतील. मात्र, त्यापैकी निवडून येण्याची शक्‍यता असलेले मतदारसंघ भाजपने युतीच्या जागा वाटपात स्वतःकडे घेतले, तर युतीचे परंपरागत विरोधक असलेल्या मतदारसंघांत युतीतर्फे शिवसेना झुंज देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com