मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

टीम ई सकाळ
Thursday, 27 August 2020

  • कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे
  • भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

पुणे : मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ तारखेला करण्यात येणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे, या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असून कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही.

ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर "दार उघड उद्धवा दार उघड" अशी हाक देत "घंटानाद आंदोलन" विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजप पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असेही चंद्रकांत पाटीले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचा राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज असल्याने आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP supports the movement to start temples