जळगावमध्ये शिवसेनेला धक्का; भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

File photo of BJP celebration
File photo of BJP celebration

सांगली/जळगाव : गेली 35 वर्षे सत्तेत असलेल्या सुरेश जैन गटाला धक्का देत भारतीय जनता पक्षाने (भाजप) जळगाव महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवित सत्तांतर घडवून आणले. महापालिकेच्या 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (शुक्रवार) सुरू आहे. दुपारी 12 पर्यंत सर्व जागांचे कल हाती आले असून 75 पैकी तब्बल 57 जागांवर भाजप आघाडीवर आहे. यामुळे सुरेश जैन आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत 14 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. 'एमआयएम'ने अनपेक्षितरित्या अस्तित्त्व दाखवून देत तीन जागा जिंकल्या. जळगावमध्ये पालिका असल्यापासून आणि 2003 मध्ये महापालिका झाल्यापासून तेथे सुरेश जैन यांचे वर्चस्व होते. जैन यांनी शिवसेना, मग राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केला; मात्र महापालिकेत त्यांच्याच गटाची सत्ता होती. यंदा मात्र परिवर्तन होईल, असा अंदाज मतदानापूर्वीच बांधला जात होता. जळगावमध्ये भाजपला 38 ते 40 जागा मिळतील, असा राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज होता. गेल्या निवडणुकीत भाजपला 12 जागांवर समाधान मानावे लागले होते. 

सांगलीत प्रस्थापितांना धक्का! 
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागात धक्का बसला. सांगलीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांचा पराभव झाला. कॉंग्रेसचे तरुण नेते मंगेश चव्हाण यांनी या प्रभागात विजय मिळवून दाखवला. या प्रभागात चारही जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत. या संपूर्ण निवडणुकीमध्ये खासदार पाटील यांनी तीनही शहरांपेक्षा जास्त ताकद प्रभाग क्रमांक 15 मध्ये लावली होती. खासदारांनी या प्रभागात पंधरा दिवस तळ ठोकला होता.  

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तंबूत दाखल झालेले कुपवाडमधील धनपाल खोत यांना पराभवाचा सामना करावा लागला. या जागेवर स्वाभिमानी विकास आघाडीकडून रिंगणात उतरलेले उपमहापौर विजय घाडगे यांनी विजय मिळविला. 

सांगली महापालिका निवडणुकीतील दुपारी 12 पर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, 78 जागांपैकी 22 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर आहे. भाजप नऊ जागांवरच आघाडीवर आहे. 

मिरजेतील जाहीर आठ जागांमध्ये दोघांनी समान चार जागा जिंकल्या आहेत. कुपवाडमध्ये प्रभाग एकमध्ये स्वाभीमानी आघाडीचे विजय घाडगे विजयी झाले. या प्रभागात एक कॉंग्रेस तर दोन राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.

मिरजेत ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या नगरसेवक सुरेश आवटी यांनी प्रभाग 3 मधील सर्व उमेदवार विजयी करीत आपण अजिंक्‍य असल्याचे सिध्द केले. त्यांचा मुलगा संदीप विजयी झाला. प्रभाग 6 माजी महापौर मैन्नुदीन बागवान, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायकवडी, रजीया काझी, नर्गीस सय्यद यांनी विजय मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com