भाजपचे ‘अब की बार २२० पार’चे लक्ष्य

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 23 जून 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री युतीचा होईल, शिवसेनेशी काय बोलायचे ते आम्ही पाहू, तुम्ही तयारी करा, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आज भाजपच्या खासदार, मंत्री, तसेच जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत  महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच व्हायला हवा, असे सांगितल्याची चर्चा होती. खासदार, आमदारांची संख्याही जास्त असताना मुख्यमंत्री भाजपचाच हवा, अशी प्रतिक्रिया बैठकीत व्यक्‍त होत होती. दरम्यान, मुख्यमंत्री कोण हा विषय अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातला आहे असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगत आम्ही एकत्र असल्याचा पुनरुच्चार केला. लोकसभेत शिवसेनेला केवळ भाजपमुळे यश मिळाल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले. दुसरीकडे पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, की शिवशाहीचे सरकार आणणे एवढेच ध्येय आहे. आम्ही एकदिलाने काम करत आहोत. शहा यांनी युतीचे काम करायला सांगितले आहे.

प्रत्येक मतदारसंघात विकासयात्रा 
ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक मतदारसंघात जाणार आहेत. प्रत्येक मतदारसंघाचा विकास कसा झाला, या सरकारने त्यासाठी काय प्रयत्न केले, हे सांगत जनतेशी संवाद साधण्यावर फडणवीस भर देतील. एकेका दिवशी किमान सहा मतदारसंघांत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न असेल असे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP target of 220 in Assembly Elections