मतांच्या टक्केवारीत भाजप आघाडीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादी दुसऱ्या, तर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर

जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादी दुसऱ्या, तर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर
मुंबई - नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा 46ने कमी झाल्या असल्या तरी भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांच्या टक्‍केवारीत केवळ 2.66 टक्‍क्‍यांचाच फरक आहे. मात्र जिल्हा परिषदांमध्ये कायम 35 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतांवर हक्‍क सांगणाऱ्या कॉंग्रेसच्या मिळालेल्या मतांच्या टक्‍क्‍यांमध्ये मोठी घट झाली असून, कॉंग्रेसला केवळ 19.43 टक्‍के मतेच मिळवता आली आहेत.

राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 406 जागा मिळाल्या. त्यासाठी त्यांना 63 लाख 76 हजार 54 मते मिळाली. एकूण मतांच्या टक्‍केवारीत 24.91 टक्‍के असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 360 जागा मिळाल्या. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला 56 लाख 93 हजार 694 मतदारांनी मतदान केले. ही मतांची टक्‍केवारी 22.25 आहे. भाजपला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्‍केवारीत 2.66 टक्‍क्‍यांचा फरक असून, 46 जागांचाही फरक आहे. यापूर्वीच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या मतांची टक्‍केवारी 30 ते 36 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झालेली नव्हती. आता मात्र 25 जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला 49 लाख 72 हजार 227 मते मिळाली आहेत आणि मतांची टक्‍केवारी 19.4 टक्‍के आहे. कॉंग्रेसला 309 जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेस आणि शिवसेनेला मिळालेल्या मतांमध्ये एक टक्‍क्‍यापेक्षा कमी अंतर आहे. शिवसेनेला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 271 जागा मिळाल्या असून, त्यांची मतांची टक्‍केवारी 18.52 टक्‍के आहेत; तर 47 लाख 39 हजार 976 मते शिवसेनेच्या वाट्याला आली आहेत. याव्यतिरिक्‍त इतर सर्व पक्षांना एक टक्‍क्‍यापेक्षा कमी मते मिळाली असून अपक्षांना मात्र 5.32 टक्‍के मते मिळाली आहेत.

जिल्हा परिषद निवडणूक
पक्ष.......मतांची टक्केवारी

भाजप : 24.91
राष्ट्रवादी : 22.25
कॉंग्रेस : 19.43
शिवसेना : 18.52
अपक्ष : 5.32

Web Title: bjp topper in voter percentage