लोकसभा-विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचा 'मास्टर प्लान'; 20 लाख कुटुंबांशी साधणार संपर्क I Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे हेच आमचे शक्तिस्थान असून, याच कामाच्या माध्यमातून आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.

Maharashtra Politics : लोकसभा-विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचा 'मास्टर प्लान'; 20 लाख कुटुंबांशी साधणार संपर्क

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेली विकासकामे व राबविलेल्या विविध योजना हेच आमचे शक्तिस्थान आहे. या कामांच्या माध्यमातून आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.

त्यानिमित्ताने भाजपचे महाजनसंपर्क अभियान (BJP Mahajansampark Abhiyan) जिल्ह्यात यशस्वीपणे राबवून १५ ते २० लाख कुटुंबांशी थेट संपर्क साधला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिली. दरम्यान, २० ते २५ जून यादरम्यान जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांच्या सभा होतील, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त भाजपच्या वतीने विशेष महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याअभियानांतर्गत जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती आमदार गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार मदन भोसले, प्रभारी संघटक अमर साबळे, प्रदेश सरचिटणीस विक्रम पावसकर, कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘या उपक्रमांतर्गत भाजपचे सर्व आमदार, खासदार तसेच पदाधिकारी जिल्ह्यात एक ते २२ जूनदरम्यान पन्नास प्रभावशाली कुटुंबांना भेट देणार आहेत. तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेणार असून, लोकसभा मतदारसंघांत देश आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात सभा होतील. या सभा २० ते २५ जून यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होतील.

याशिवाय २५ जून रोजी बुद्धिवंतांचा मेळावा, जिल्हास्तरावर व्यापारी संमेलन, खासदार, आमदार यांचा सहभाग असलेले विकास तीर्थ संमेलन तसेच भाजपच्या वेगवेगळ्या सात मोर्चांचा संयुक्त मेळावा, कऱ्हाड दक्षिण येथे लाभार्थी मेळावा, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून योग शिबिरे होतील. २३ जून रोजी भारतातील बूथस्तरीय कॉन्फरन्सला नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे युवकांना संबोधित करणार आहेत.

तसेच २० ते ३० जून यादरम्यान मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहितीपत्रके घरोघरी वाटण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये यानिमित्ताने जवळपास ४० रॅली, दीडशेहून अधिक सभा आणि साडेतीनशेहून अधिक पत्रकार परिषदा होणार आहेत. कमीत कमी १५ ते २० लाख कुटुंबांशी थेट संपर्क साधला जाणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी भाजपने यानिमित्ताने केली आहे.

या राजकीय संपर्क अभियानाचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक आमदार व खासदारांना विविध कार्यक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात ११४५ बूथ असून, त्या प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असून, त्यांना पुढील वर्षासाठी कार्यक्रम ठरवून देण्यात आला आहे.’

कोण रामराजे....

राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान भाजपपुढे असेल का? या प्रश्‍नावर आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘कोण रामराजे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे हेच आमचे शक्तिस्थान असून, याच कामाच्या माध्यमातून आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. यासंदर्भातील सविस्तर नियोजन केंद्रीय कार्यकारिणीद्वारे जाहीर केले जाणार आहे.’