विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या मागण्यांमुळे भाजपला चिंता

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

 विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, भाजपचा ‘फिप्टी फिप्टी’चा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. त्यातच मित्र पक्षांनी दोन आकडी जागांची मागणी केल्याने भाजपची चिंता वाढली आहे.  

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, भाजपचा ‘फिप्टी फिप्टी’चा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. त्यातच मित्र पक्षांनी दोन आकडी जागांची मागणी केल्याने भाजपची चिंता वाढली आहे.  

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाच्या चर्चेला आजपासून सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता जागावाटपाचा मुद्दाही ताणला जाण्याची शक्‍यता आहे.  अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे (रिपाइं) सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत १० जागा मिळायलाच हव्यात, अशी मागणी केली आहे. भाजप आणि शिवसेनेने मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. यापैकी १० जागांवर रामदास आठवले यांनी हक्क सांगितला आहे. तसेच या निवडणुकीत ‘रिपाइं’ भाजपच्या नव्हे, तर स्वत:च्याच चिन्हावर निवडणूक लढवेल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीमधील इतर घटकपक्षांच्या वाट्याला केवळ आठच जागा येतील असा अंदाज आहे. परिणामी, इतर घटक पक्ष नाराज होण्याची शक्‍यता आहे. भाजपचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी भाजपकडे ५५ जागांची मागणी केली आहे. यापैकी पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी किमान १२ जागा आवश्‍यक असल्याचे जानकर यांचे म्हणणे आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि माजी आमदार विनायक मेटे यांनी देखील दोन आकडी जागांची मागणी केल्याने भाजप काळजीत पडला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल.
- संजय राउत, शिवसेना नेते

आम्हाला १० जागा हव्या आहेत आणि आम्ही भाजपच्या नव्हे तर रिपाइंच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहोत
- रामदास आठवले, रिपाइं नेते

शिवसेनेला ११० पेक्षा कमी नको
जागावाटपासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची पहिली बैठक आज पार पडली. या वेळी भाजपने १६० जागांची मागणी केली. मात्र शिवसेनेने ११० पेक्षा कमी जागा स्वीकारायला नकार दिला. भाजपकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष पुढे आला होता, तर महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP worried about Allied demands for Assembly