भाजपची जिल्हा परिषद सत्तास्थापनेची वाट झाली बिकट

BJP
BJP

तीन ठिकाणीच सत्तेची शक्‍यता; संभाव्य महाशिवआघाडीला फायदा 
पुणे - आगामी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीत मुख्यमंत्रिपदावरून तुटलेल्या भाजप-सेना युतीची भाजपला जबर किंमत मोजावी लागणार आहे. संभाव्य  ‘महाशिवआघाडी’मुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदांमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली गेली आहेत. भाजपची जिल्हा परिषद सत्तास्थापनेची वाट बिकट बनली आहे. यामुळे भाजपवर किमान सात जिल्हा परिषदांमधील सत्ता गमविण्याची वेळ येणार आहे. परिणामी, राज्यातील केवळ तीन जिल्हा परिषदांवर भाजपला निर्विवाद सत्ता मिळविता येणार आहे.

संभाव्य ‘महाशिवआघाडी’तील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही राजकीय पक्षांना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीत मोठे यश पदरात पडणार आहे. या तीन पक्षांना मिळून २६ पैकी २१ जिल्हा परिषदांमध्ये सहजासहजी सत्ता काबीज करता येईल. कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र त्रिशंकू स्थिती असल्याने, ही जिल्हा परिषद अन्य आघाडीची मदत घेतल्याशिवाय भाजप किंवा महाशिवआघाडी यापैकी कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही.  

भाजपचे लातूर, वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्हा परिषदेत निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे या तीनच जिल्हा परिषदांत त्यांना त्यांची सत्ता राखता येणार आहे. बहुमत नसतानाही सत्तेच्या जोरावर अन्य सदस्यांच्या मदतीने सत्ता मिळविलेल्या किमान सात जिल्हा परिषदांमधील सत्ता भाजपला गमवावी लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव या तीन प्रमुख जिल्हा परिषदांचाही समावेश असणार आहे. 

सद्यःस्थितीत राज्यातील २६ पैकी केवळ सात जिल्हा परिषदांत कोणत्या तरी एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. यापैकी तीन भाजप, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका जिल्हा परिषदेचा समावेश आहे. 

या सात वगळता उर्वरित १९ पैकी केवळ पाच जिल्हा परिषदांमध्ये महाआघाडीची सत्ता असून, १४ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आहे. महायुतीच्या १४ पैकी फक्त चार ठिकाणी शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. उर्वरित दहा झेडपीवर भाजपची सत्ता असून, त्यापैकी फक्त तीनमध्ये स्पष्ट बहुमत आहे. उर्वरित सात या शिवसेनेच्या मदतीने मिळविलेल्या आहेत. या ठिकाणी आता महाशिवआघाडीची सत्ता येऊ शकते.

राज्यातील जिल्हा परिषदा दृष्टिक्षेपात... 
  जिल्हा परिषदांची संख्या     ३४ 
  जानेवारीमध्ये अध्यक्षांची होणारी निवड     २६ 
  २६ जिल्हा परिषदांच्या सदस्यांची संख्या    १५०८ 
  भाजपचे एकूण जि. प. सदस्य     ४११
  राष्ट्रवादी काँग्रेसचे जि. प. सदस्य     ३७६ 
  काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य     ३०७ 
  शिवसेना सदस्यांची संख्या     २७४ 
  अपक्ष आणि अन्य आघाड्या     १४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com