भाजप उपाध्यक्षांनी फडकावला तीस लाखांचा चेक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

महापालिका निवडणुकीचे नगारे वाजायला लागल्यापासून भाजपमधील "श्रीमंती" ची बरी चर्चा सुरु आहे. ही चर्चा थेट चव्हाट्यावर मांडण्याची कामगिरी सचिन चौगुले या भाजपच्याच जिल्हा उपाध्यक्षाने केली. उमेदवारीसाठी मुलाखती सुरु असताना तीस लाखांचा चेक फडकावत थेट आव्हान दिले. "बोला, आता तरी तिकीट देणार काय?" अशी विचारणा केली.

मिरज : महापालिका निवडणुकीचे नगारे वाजायला लागल्यापासून भाजपमधील "श्रीमंती" ची बरी चर्चा सुरु आहे. ही चर्चा थेट चव्हाट्यावर मांडण्याची कामगिरी सचिन चौगुले या भाजपच्याच जिल्हा उपाध्यक्षाने केली. उमेदवारीसाठी मुलाखती सुरु असताना तीस लाखांचा चेक फडकावत थेट आव्हान दिले. "बोला, आता तरी तिकीट देणार काय?" अशी विचारणा केली. त्याच्या प्रश्‍नावर काही क्षण खासदार आमदारांसह पक्षश्रेष्ठींनाही काय बोलावे सुचेना झाले. मिरजेत पक्षाचे जुने निष्ठावंत, ऐन निवडणुकीच्या तोंडावर थैल्या घेऊन भाजपमध्ये आलेले आयाराम यांच्यात बराच संघर्ष सुरु आहे. भाजपकडून पैसेवाल्यांना उमेदवारी दिली जात असून निष्ठावंतांना पायदळी तुडवले जात आहे, असा आरोप होत आहेत. जुन्या निष्ठावंतांच्या काही बैठकाही झाल्या आहेत. मुंबई-दिल्लीपर्यंत तक्रारी गेल्या आहेत. ही चर्चा आज जाहीर व्यासपीठावर मांडण्याचे धाडस चौगुले यांनी केले. 

प्रभाग क्रमांक सातमध्ये चौगुले यांना संधीची चर्चा होती. गेले वर्षभर तयारीही करत होते. ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले. तरीही आज ते मुलाखतींसाठी आले होते. सुरुवातीपासूनच त्यांनी पक्षाचा बुरखा फाडायला सुरुवात केली. ते म्हणाले,"दहा वर्षे पक्षासाठी जीवाचे रान करतो. पदरमोड करुन पक्षाचे कार्यक्रम राबवलेत. आज संधी मिळेल असे वाटत असतानाच आयारामांच्या गळ्यात पक्षाने हार घातला. मला का डावलले याचे कारण पक्षाने दिले पाहीजे. आमदार सुरेश खाडे यांनाही माझे काम माहीती आहे; तरीही पक्षाने दुर्लक्ष केले. विनींग मेरीट हाच एकमेव निकष लावला जात आहे. पैसेवंतांना उमेदवारी मिळत आहे. 

मीदेखील तीस लाखांचा खर्च करण्यास तयार आहे. हा घ्या चेक, कोणाच्या नावे लिहू सांगा. बोला तिकीट देणार काय?" चौगुले यांच्या पवित्र्याने पक्षश्रेष्ठी अवाक्‌ झाले. काय बोलावे सुचेना. पक्षनिरिक्षक रवी अनासपुरे, अतुल भोसले, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, नीता केळकर, शेखर इनामदार, दीपक शिंदे यांच्या समोरच चौगुले यांनी आव्हान दिले. 

खासदार पाटील यांनी सावरुन घेत सांगितले कि "असा कोणताही प्रकार पक्षात नाही. चुकीचे बोलू नका". पत्रकारांशी बोलताना खासदार पाटील म्हणाले, उमेदवारी न मिळाल्याने चौगुले यांनी हा प्रकार केला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे धोरण समजून घेतले पाहीजे." 

Web Title: BJP's Vice President has given Rs 30 lakhs check