
Black Fort : धारावीच्या वस्तीत दडलेला काळा किल्ला तूम्ही पाहिलाय का?
धारावी केवळ मुंबईकरांसाठीच नाही तर जगभरात भारताची नवी ओळख बनलेली धारावी. चित्रपट बनवणाऱ्यांना शुटींगपूरती अन् राजकारण्यांना मदतानापुरती लागते ती धारावी झोपडपट्टी. तूम्ही १० वर्षांआधी धारावी परिसरात गेला असाल तर आता नक्की जाऊन बघा आजही तिथे जैसे थेच परिस्थिती आहे.
असो, आजचा आपला विषय झोपडपट्टी नाही. तर त्या अस्वच्छतेत दडलेला एक किल्ला आहे. होय, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत रिवा नावाचा एका किल्ला आहे. आता त्याची ओळख काळा किल्ला म्हणून केली जाते. काय आहे त्याचा इतिहास, तो कोणी आणि का बांधला तसेच तो शिवकालीन किल्ला आहे का? या बद्दलची माहिती जाणून घेऊयात.
या कथेची सुरूवात १७३७ पासून होते. त्या काळात मिठी नदीच्या तीरावर वसलेली धारावी इंग्रजांचा ताबा असलेलं ‘बॉम्बे’ आणि पोर्तुगीज लोकांनी बळकावलेलं सॅल्सेट बेट यांच्यामध्ये होती. १७३७ मध्ये सॅल्सेट या बेटावरुन आपल्या शूरवीर मावळ्यांनी पोर्तुगीजांना हुसकावून लावले. तिथे मराठेशाहीचा झेंडा फडकवला होता. मराठ्यांचा हा पराक्रम बघून इंग्रजांचे धाबे दणाणले.
मराठा सरसेनापती कान्होजी आंग्रे यांच्याबद्दल इंग्रजांच्या मनात भीती निर्माण झाली होते. मराठ्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तत्कालीन ‘बॉम्बे कमिशनर’ जॉन हॉर्न यांनी धारावीत एक किल्ला बांधायचं ठरवले. ‘रिवा फोर्ट’ असे या किल्ल्याला नाव देण्यात आले होते.
१७३७ मध्ये हा किल्ला तत्कालीन मुंबईच्या राज्यपालांच्या आदेशावरून बांधण्यात आला आहे.अशी पाटी या किल्ल्यावर लावण्यात आली आहे. किल्ला बांधणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या सह्याही या पाटीवर आहेत. १७३४ ते १७३७ या काळात मुंबईचे १९ वे राज्यपाल जॉन हॉर्न यांनी ‘रिवा’ किल्ल्याच्या बांधकामाची पाहणी केली होती. त्याची देखील यावर नोंद आहे.

किल्ल्यावरील पाटी
कशी आहे या किल्ल्याची रचना
रिवा किल्ल्याला तीन बुरुज आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी तीन जागा आहेत ज्या भुयारी मार्गाकडे जातात. या भुयारी मार्गांकडे गेल्यावर एक अगदी कमी उंची असलेलं भुयार दिसतं. सध्या ही जागा झाडांची पानं आणि कचऱ्याने भरलेली आहे. पण, त्याचा साचा बघून इथे कधीकाळी एक किल्ला होता आणि हा त्याचा अंतर्गत रस्ता होता हे लक्षात येऊ शकतं.

किल्ल्यावरील तळघर
भुयाराच्या आत गेल्यावर एक छोटी चौकट दिसते. ही चौकट इतकी लहान आहे की त्यातून केवळ एखादा पक्षी किंवा प्राणी सरपटत जाऊ शकतो. १७ व्या शतकात इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं हे बांधकाम आपल्याला नक्कीच चकित करतं.

किल्ल्याच्या आत जाण्याचा एकमेव मार्ग
तिथली तटबंदी व वरील तोफा रोखण्याच्या जागा अजुनही सुरक्षित आहेत. एवढंच नाही तर या लांबट आकाराच्या किल्ल्यात मधोमध एक गुप्त तळघर देखील आहे. या किल्ल्यात सैनिकांच्या वास्तव्याची जागा हि एकच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला नसला तरी तो इतिहासाचा साक्षिदार आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन व्हावे अशी मागणी इतिहास संशोधक करतात. सध्या या किल्ल्याची अवस्था दयनिय आहे. किल्ल्याच्या आतील भागात झाडी आहे आणि या जागेला भेट दिलेल्या लोकांनी टाकलेल्या कचऱ्याचं जाळं आहे.