'ब्लड ऑन कॉल' योजना कोमात

Blood
Blood

नागपूर - खासगी रुग्णालयांचा "ब्लड ऑन कॉल' या योजनेत सहभाग नसल्यामुळे ही योजना "कोमात' आहे. काही वेळा खासगी रुग्णालये या योजनेअंतर्गत पुरविण्यात आलेले रक्त स्वीकारत नाहीत. काही वेळा रक्त उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला या योजनेचा लाभ मिळत नाही. यामुळे सरकारच्या "डॉक्‍टर आपल्या दारी' या योजनेप्रमाणे "ब्लड ऑन कॉल' ही योजना गटांगळ्या खात असल्याचे दिसते.

राज्यात दोन वर्षांपूर्वी ब्लड ऑन कॉल योजना सुरू झाली. 104 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून रक्ताची मागणी नोंदविल्यास तासाभरात 40 किलोमीटरच्या आतील रुग्णालयात रक्ताची पिशवी रुग्णापर्यंत पोचेल, अशी व्यवस्था होते. सरकारी रक्तपेढीच्या सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर परिसरातील रुग्णालयांमध्ये दाखल कोणत्याही रुग्णांना हे रक्त उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम सुरवातीला सुरू होता. परंतु, रक्ताच्या उपलब्धतेअभावी योजना मंदावली. योजनेतील रक्त सुरक्षित नसल्याचे कारण समोर करून खासगी रुग्णालयांनी ब्लड ऑन कॉल योजनेतील रक्त नाकारण्यास सुरवात केली. या योजनेतील रक्ताच्या पिशवीसाठी 450 रुपये सेवाशुल्क आकारतात, तर खासगी रुग्णालयांमधून एक हजार रुपयांपर्यंत सेवाशुल्क घेतात.

स्वेच्छा रक्तदानाचा टक्का कमी
लोकांनी स्वत:हून रक्तदान केल्यास टंचाई भासणार नाही. येथे दरवर्षी दीड लाख रक्तपिशव्यांची गरज आहे. मात्र, लाखापेक्षा अधिक रक्तपिशव्या गोळा होत नाहीत. विशेष असे, की मेडिकलमधील रक्तपेढीत कधीकाळी काहीच रक्तपिशव्या गोळा व्हायच्या. परंतु, डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. संजय पराते, डॉ. आरती दाणी आणि सामाजिक अधीक्षक किशोर धर्माळे (वैद्यकीय) यांच्या प्रयत्नांतून मेडिकलची रक्तपेढी आदर्श ठरली. दरवर्षी 14 हजार युनिट रक्त गोळा होते. विदर्भासहित छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणातील रुग्णांची गरज मेडिकल भागवते.

रक्त विघटन प्रकल्प रेंगाळला
सातारा - रक्त विघटन प्रक्रिया प्रकल्पाची इमारत बांधून पूर्ण असली, तरी आवश्‍यक यंत्रसामग्रीअभावी येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात (जिल्हा शासकीय रुग्णालय) अद्याप प्रकल्प सुरू झालेला नाही. प्रकल्प चार वर्षांपूर्वी मंजूर झाला. त्या वेळी आवश्‍यक यंत्रणाही आणली. मात्र, इमारतीअभावी परत गेली. दोन वर्षांपूर्वी इमारत बांधली, मात्र, लाल फितीच्या कारभाराने यंत्रणाच मिळालेली नाही. त्यामुळे रक्तघटकांसाठी खासगी रक्तपेढीकडे जादा पैसे मोजावे लागतात.

जिल्ह्याचा भार घाटीच्या रक्तपेढीवर
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) विभागीय रक्तपेढीवर जिल्ह्यातील पुरावठ्याचा भर आहे. "घाटी'त वर्षभरात 15 ते 16 हजार रक्त पिशव्या संकलित करून घटक वेगळे करण्यात येतात. ही अद्ययावत यंत्रणा घाटीत आहे. राज्य कर्करोग संस्थेसह ब्लड ऑन कॉल सेवाही मिळते. गेल्या वर्षी शंभरहून अधिक बॅग 40 किलोमीटरच्या परिसरातील रुग्णांना पोचवल्याचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत रुळे यांनी सांगितले. रक्ताची नॅट तपासणी करून रक्त व घटक रुग्णांना पुरवठा करण्यासाठी "घाटी'चा दोन कोटींचा प्रस्ताव निधीसाठी प्रलंबित असल्याचे विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू यांनी सांगितले. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, सिल्लोड व कन्नड येथील शासकीय रुग्णालयांत स्टोरेज सेंटरची मान्यता आहे, असे डॉ. पद्मा बकाल म्हणाल्या.

योजनेला अत्यल्प प्रतिसाद
नाशिक - जिल्हा सरकारी रुग्णालय, सुपरस्पेशालिटी संदर्भ रुग्णालय आणि महापालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये रक्त विघटन यंत्रणा आहे. जिल्हा रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी आहे. याशिवाय खासगी अर्पण आणि जनकल्याण रक्तपेढ्या आहेत. जिल्हा रुग्णालयात रक्तदानातून संकलित एका रक्त पिशवीच्या विघटनातून तीन रक्त पिशव्या तयार होतात. शासनाच्या महत्त्वाकांक्षी "ब्लड ऑन कॉल' योजनेला अत्यल्प प्रतिसाद आहे. विशेषत: खासगी रुग्णालयांकडूनच त्याचा अधिक वापर होतो.

जिल्ह्यात रक्तदानाविषयी जागृती
कोल्हापूर - जिल्ह्यात रक्तदानविषयक चांगली जागृती आहे. जिल्ह्यात खासगी आणि शासकीय रुग्णालयांचे प्रमाणही भरपूर आहे. रक्त संकलनाला मागणी तसा पुरवठा होतो. जिल्ह्यात सरकारी दोन, तर खासगी 10 रक्तपेढ्या असून, रक्त विघटन प्रकल्पही आहे. रक्त विघटनापासून प्लाझ्मा, प्लेटलेटस्‌, ईसीजी, क्रायोप्रेसिपिटेटस्‌ असे चार घटक निर्माण होतात. रक्तपेढ्यांमधील पायाभूत सुविधांचे जाळेही उत्तम आहे.

रक्त विकत घेऊन उपचार करणे गरिबांच्या आवाक्‍यात नाही. यामुळे तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानाचा धर्म निभावावा.
- डॉ. संजय पराते, विभागप्रमुख, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com