
मुंबई : गणेश विसर्जनातील निर्माल्याचे बीएमसी करणार कंपोस्ट खत
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुंबईत गणेश विसर्जनाच्या वेळी गोळा केलेले 5.49 लाख किलो निर्माल्य (फुले आणि हार) कंपोस्ट करणार आहे. दरवर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबईतील समुद्रकिनारे आणि कृत्रिम तलावांमध्ये लाखो फुले आणि हार जमा होतात. निर्माल्य योग्य प्रकारे नष्ट केले नाही, तर प्रदूषण आणि कचरा वाढू शकतो. हे लक्षात घेऊन बीएमसीने निर्माल्य कंपोस्टमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
2020-2021 च्या तुलनेत यावर्षी निर्माल्य 2.5 लाख किलोने वाढले आहे. राज्यात दोन वर्षांनंतर गणेशभक्तांनी गणेशोत्सव थाटामाटात साजरा केल्याने यंदा फुलांचे आणि हारांचे निर्माल्य वाढले आहे.
कंपोस्ट खत कसे बनवले जाईल?
खत तयार करण्यासाठी सर्वप्रथम फुले आणि हार उन्हात वाळवल्यानंतर त्यामध्ये गांडूळ टाकण्यात येतील.
गांडुळाने फुले व हार खाल्ल्यानंतर त्याची विष्ठा सुकवून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचे खतामध्ये रूपांतर होते.
या प्रक्रियेस एक महिना लागतो.
सर्वात जास्त फुले आणि हार कुठे मिळाले?
गणेशोत्सवादरम्यान भांडुपमधून सर्वाधिक 77,825 किलो फुलांच्या हारांचे संकलन झाले. अंधेरी पश्चिम येथे 59,500 किलो, बोरीवलीमध्ये 55,700 किलो, वांद्रे येथे 46,280 किलो आणि कुर्ला येथे 45,450 किलो आढळले.