किसमे कितना है दम !

प्रकाश पाटील
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

बाळासाहेबांचा दरारा आणि धाक इतका होता की त्यांच्या शब्दाबाहेर जाताना दहावेळा त्यांना विचार करावा लागत असे. त्यांनी भाजप आणि संघाला दूषणे द्यायची संधीही कधी सोडली नाही. कधी "पांढऱ्या मिशांचा संघ‘ तर "कमळाबाई‘ अशी टीका करीत. मात्र ठोशाला ठोसा देण्याची धमक भाजपत नव्हती हे आजही मान्य करावे लागेल. त्यांच्या मागे आता ही ताकद शिवसेना पक्षप्रमुखांकडे नसली तरी तेही संधी सोडत नाही. मात्र बाळासाहेब बाळासाहेबच होते. हे मान्य करावे लागेल.

मुंबईचा खरा सामना दोन कर्णधारामध्ये रंगेल असे सध्या तरी चित्र दिसते. हे कर्णधार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. जर युती झाली तर सर्वच समीकरणे बदलतील. अन्यथा सामना रंगत आणेल हे निश्‍चित ! घोडे मैदान जवळ आहे. पाहू या "किसमे कितना है दम!‘ 

भाजपचा सर्वांत जुना हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेला ओळखले जाते. पंचवीस वर्षाहून अधिक काळ हातात हात घालून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी त्यांनी सामना केला. काही वेळा यश तर काही वेळा सपाटून मारही खावा लागला. जोपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब होते तोपर्यंत भाजपची फरपट सुरू होती. एकदा नव्हे अनेकदा त्यांच्यापुढे नाक घासण्याशिवाय या पक्षाच्या नेत्यांकडे दुसरा पर्यायही नव्हता. बाळासाहेबांचा दरारा आणि धाक इतका होता की त्यांच्या शब्दाबाहेर जाताना दहावेळा त्यांना विचार करावा लागत असे. त्यांनी भाजप आणि संघाला दूषणे द्यायची संधीही कधी सोडली नाही. कधी "पांढऱ्या मिशांचा संघ‘ तर "कमळाबाई‘ अशी टीका करीत. मात्र ठोशाला ठोसा देण्याची धमक भाजपत नव्हती हे आजही मान्य करावे लागेल. त्यांच्या मागे आता ही ताकद शिवसेना पक्षप्रमुखांकडे नसली तरी तेही संधी सोडत नाही. मात्र बाळासाहेब बाळासाहेबच होते. हे मान्य करावे लागेल. 

मुंबई महापालिकेत युती करायची की नाही यावरून युतीत कलगीतुरा रंगला. गेल्या विधानसभा निवडणुकीचा फार्मुला यावेळीही भाजपला राबवायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे शिवसेनेवर भाजपचे नेते तुटून पडत असतानाच शिवसेनाही तेच करते. गेल्या काही वर्षापासून मुंबईवर शिवसेनेची सत्ता आहे. येथील त्यांची सत्ता खेचून आणल्यास भाजपला भविष्यात विधानसभेत बहुमत मिळविण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच शिवसेनेला जेवढे चेपता येईल तितके चेपण्याची संधी भाजप सोडणार नाही. मुंबई महाराष्ट्राची लाइफलाइन असल्याने शिवसेना वाढीला मुंबईची सत्ताही फायद्याचीच ठरली. हे खरे. मुंबई ही मराठी माणसाची असली तरी आज हे शहर कॉस्मॉपॉलिटन म्हणूनच ओळखले जाते. मराठीबरोबरच परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे वळविण्यात भाजपला काहीप्रमाणात यश आले. हे मान्य करावे लागेल. त्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली. मुंबईचा विचार केला तर येथे शिवसेना, कॉंग्रेस, भाजपची ताकद आहे इतर पक्षाची ताकद म्हणावी तशी राहिलेली नाही. मनसेला बळ देऊन शिवसेनेच्या मतात घट निर्माण करण्याचा भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळे शिवसेनेला चारीबाजूने घेरण्याचा प्रयत्न भाजप निश्‍चितपणे करणार ही काळादगडावरील रेख. जर मुंबईत सत्तांतर झाले तर भाजपची महाराष्ट्रातील घौडदौड जोमात असेल. 

या घौडदोडीला रोखणे शिवसेना, दोन्ही कॉंग्रेससमोर मोठे आव्हान असेल. तसेच येथे हे ही मुद्दाम लक्षात घेण्याची गरज आहे, की शिवसेनेला प्रथम मुंबईत सत्ता मिळाली त्यानंतर ठाणे त्यानंतर ती महाराष्ट्रात फोफावली. आज भाजपची महाराष्ट्रात ताकद वाढली आहे. (मोदी लाटेमुळे म्हणा हवे तर). मुंबई हातात आली की राज्याच्या राजकारणाची समीकरणही बदलेल असे या पक्षाच्या नेत्यांना वाटते. मुंबईत सत्ता आली तर भाजपच्या पथ्यावरच पडेल. नाही आली तरी फारसे बिघडणार नाही. मात्र जर शिवसेनेची मुंबईवरील सत्ता गेली तर काय होईल ? यावर अनेक प्रश्‍न पुढे येऊ शकतात. शिवसेनेला खूप मोठा राजकीय फटका बसू शकतो. हे सर्व खरे असले तरी शिवसेनाही सहजासहजी मुंबईवरील पकड ढिली होऊ देणार नाही. राज्यात इतरत्र काही झाले तरी ते शिवसेनेला सहन होईल. पण मुंबई शिवसेनेचा प्राण असल्याने ती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल हे ही तितकेच खरे. मुंबईतील शिवसेनेचे नेटवर्क आजही उत्तम आहे हे नाकारून चालणार नाही. गल्लीबोळात त्यांच्या शाखा आहेत. मतदार बाहेर काढण्यासाठी फौज आहे. शिवसेनेने खासदार, आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते अशी फळी आहे. कोणी काही म्हटले तरी शिवसेना सपाटून मार खाईल असेही म्हणता येणार नाही. जर युती झाली नाही तर खरी लढाई भाजप आणि शिवसेनेतच होणार हे नक्की. मुंबईतील रिपब्लिकन पक्षाची मते कोणाकडे वळतात हे ही महत्त्वाचे असेल. 

रामदास आठवले आज मंत्री आहेत. त्यांच्या पक्षाची ताकदही आहे. तसेच प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, समाजवादी पक्ष, मनसे या छोट्याछोट्या गटांचेही महत्त्व नको तितके वाढेल असे राजकीय वर्तुळात आतापासूनच बोलले जाते.मुंबईचा खरा सामना दोन कर्णधारामध्ये रंगणार आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. जर युती झाली तर सर्वच समीकरणे बदलतील. जर युती झाली नाही तर सामना रंगत आणेल. घोडे मैदान जवळ आहे. पाहू या "किसमे कितना है दम !‘

Web Title: BMC polls: Shiv Sena prepares ground to contest without BJP