पूरग्रस्त विद्यार्थ्यांना "बालभारती'कडून पुस्तके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

राज्यातील विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थ्यांना बसला. पुरामुळे शालेय साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना शाळेने गणवेशसक्ती करू नये, अशी सूचना शिक्षण विभागाने केली होती.

मुंबई - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना "बालभारती'ने एक लाख 54 हजार 917 पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली आहेत. "बालभारती'ने ही पुस्तके दोन महानगरपालिका आणि पाच जिल्हा परिषदांकडे दिली आहेत.

राज्यातील विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थ्यांना बसला. पुरामुळे शालेय साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना शाळेने गणवेशसक्ती करू नये, अशी सूचना शिक्षण विभागाने केली होती. या पार्श्‍वभूमीवर या विद्यार्थ्यांना तत्काळ पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी "बालभारती'मधील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार या विद्यार्थ्यांना तातडीने मोफत पुस्तकाचे वाटप केले जाणार आहे.

"बालभारती'ने सांगली महापालिकेकडे विविध इयत्तांची 34 हजार 628 पुस्तके; तर कोल्हापूर महापालिकेकडे 10 हजार 293 पुस्तके दिली आहेत. सांगलीतील पलूस तालुक्‍यासाठी 19 हजार 201, वाळवा तालुक्‍यासाठी 35 हजार 574, मिरज तालुक्‍यासाठी 33 हजार 955, शिराळा तालुक्‍यासाठी 16 हजार 695; तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी चार हजार 571 पुस्तके दिली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Books from Balbharati to flood affected students