बछड्यांना शोधणार "बोरिवली'चे पथक 

नेत्वा धुरी
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या 100 जणांच्या पथकाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विशेष पथक या बछड्यांना पकडण्याच्या मोहिमेसाठी पांढरकवड्याला रवाना झाले आहे. अवनीच्या बछड्यांना पकडण्यास स्थानिक वन अधिकारी घाबरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

अवनी वाघिणीच्या बछड्यांना पकडण्यात वन विभागाला अपयश येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयात मंगळवारी (ता. 13) बैठक घेण्यात आली. बछड्यांना शोधण्यासाठी 100 वन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा आदी उपस्थित होते. मुंबईतील दोन दिवसांच्या मुक्कामात मिश्रा यांनी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वास्तव्य केले होते. मंत्रालयातील बैठकीपूर्वी त्यांनी उद्यानामधील बचाव पथकाला पांढरकवड्यातील परिस्थितीची माहिती दिली आणि तातडीने रवाना होण्यास सांगितले. 

पांढरकवड्यातील गोराठी भागापासून सात-आठ किलोमीटर अंतरावरील सावरगाव आणि विहीरगाव भागात या बछड्यांचे वास्तव्य असावे, असे सांगितले जाते. या बछड्यांनी माणसाचे मांस खाल्ल्याचा अंदाज असल्याने स्थानिक वन अधिकारी त्यांना पकडण्यास धजावत नाहीत, अशी चर्चा आहे. 

बछड्यांसाठी कोंबड्या, बकरीची पिले 
अवनी वाघिणीचे बछडे भुकेने व्याकूळ होऊ नयेत म्हणून ठिकठिकाणी मांसाचे तुकडे ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोंबड्या आणि बकरीची पिले सोडण्यात आली आहेत. राष्ट्रीय उद्यानाच्या पथकासह आणखी काही पथकेही पांढरकवड्यात दाखल झाली आहेत. 

Web Title: Borivli squad To find the calves