निमंत्रित साहित्यिकांचा संमेलनावर बहिष्कार

निमंत्रित साहित्यिकांचा संमेलनावर बहिष्कार

मुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतल्याने संपूर्ण साहित्य विश्‍वात तीव्र निषेध व्यक्त होत आहे. संमेलनातील परिसंवाद आणि चर्चासत्रात निमंत्रित करण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर, श्रीकांत देशमुख, बालाजी सुतार, नामदेव कोळी, इंद्रजित भालेराव, मंगेश काळे, गणेश मोहिते, रामचंद्र काळुंखे, प्रा. जयदेव डोळे आदींनी संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. 

नयनतारा यांच्या जहाल भाषणामुळे निमंत्रण मागे घेतल्याची चर्चा समाजमाध्यम आणि साहित्य वर्तुळात सुरू आहे. या घटनेचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया आज व्हायरल झाल्या. ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत अबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, आसाराम लोमटे आदींनीही निषेध नोंदवला. संमेलन आयोजकांचे हे कृत्य मराठी भाषा संस्कृतीसाठी आव्हान आहे, असे मत श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. जो कलावंत प्रस्थापित सत्तेविरोधात बोलेल त्याची गळचेपी केली जाते, असे वातावरण देशात आहे. एवढेच नाही, तर या घटनांचा संबंध दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणापर्यंत आहे. विरोधकांचा आवाजच बंद करणे, याचेच प्रतीक म्हणून मी या घटनेकडे पाहतो, म्हणून संमेलनाचा मी निषेध करतो, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली. 

हा केवळ सहगल यांचाच नव्हे, तर संपूर्ण साहित्यिकांचा अपमान आहे. त्यांना बोलण्यास बंदी घातली जाते, मग आम्ही संमेलनात जाऊन काय बोलणार, असा सवाल बालाजी सुतार यांनी उपस्थित केला. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, की संमेलनाचे आयोजक आणि महामंडळ हे गुंडगिरीपुढे वाकू शकते हे स्पष्ट होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा गदाच आहे. तुम्हाला यायचे तर आमच्या मनासारखे बोला, नाही तर तुम्हाला अपमानित करू, हे वागणे लोकशाहीला धरून नाही. भारतभर अशा प्रकारची सहिष्णुता धुमाकूळ घालते आहे. त्याचा प्रत्यय संमेलनातील या घटनेने दिला. 

पत्रकारांचाही बहिष्कार 
"संमेलनात माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची?' यावरील "टॉक शो'मध्ये सहभागी होणारे ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, ज्ञानेश महाराव, संजय आवटे, तसेच "प्रतिभावंतांच्या सहवासात' या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून निमंत्रित केलेले राजीव खांडेकर यांनी संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. 

वादात सरकारला  खेचू नये - तावडे 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देण्याचे काम वगळता संमेलनात सरकारची कोणतीही भूमिका नसते. संमेलनाच्या कुठल्याही निर्णयात राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही. संमेलनाचे संपूर्ण वेळापत्रक हे आयोजकांमार्फत ठरवण्यात येते. त्यामुळे संमेलनाबाबत सध्या सुरू असलेल्या वादात राज्य सरकारला खेचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. 

एखाद्या लेखिकेला संमेलनासाठी निमंत्रण द्यायचे आणि नंतर काही तरी कारण सांगून ते मागे घ्यायचे, हा अत्यंत वाईट प्रकार आहे. नयनतारा यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिकेला आयोजकांनी अशी वागणूक द्यावी हे पटणारे नाही. त्यामुळे या संमेलनावर बहिष्कार टाकून आयोजकांचा निषेध करतो. 
- वसंत आबाजी डहाके,  ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे माजी अध्यक्ष 

साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक! 
मराठी साहित्य संमेलनात उद्‌घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते, असा खुलासा मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने आज केला आहे. या संदर्भातील पत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले. 

यवतमाळ येथे आयोजित साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उद्‌घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरून वाद उभे केले जात आहेत. यात राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्नही काही माध्यमे हेतूपुरस्सर करीत आहेत. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो, असे पत्रकात नमूद केले आहे. 

साहित्य संमेलनांमधून सरकारवर, समाजातील निरनिराळ्या विषयांवर मते नेहमीच व्यक्त केली जात असतात, त्या मतांकडे सरकारही सकारात्मकपणेच पाहत असते, त्यामुळे अकारण ज्या विषयांचा संबंध नाही, तेथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करू नये, असेही पत्रकात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com