‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार

सोमेश्वरनगर - ‘आरटीई’नुसार २५ टक्के राखीव जागांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) यांनी दिला आहे. मागील दोन वर्षांच्या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती न झाल्याने ‘मेस्टा’ने हा निर्णय घेतला आहे. यामुळे ११ फेब्रुवारीपासून पुणे जिल्ह्यात सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकातील मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. त्यापोटी प्रतिविद्यार्थी सुमारे सतरा ते अठरा हजार रुपये देऊन सरकारकडून शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. यासाठी पुणे शहराच्या धर्तीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दोन वर्षांपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले असून, ११ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज दाखल करायचे आहेत. त्याची ११ मार्चला एकाच टप्प्यात सोडत काढली जाणार आहे. परंतु, ‘मेस्टा’च्या पुणे जिल्हा शाखेने नुकतीच एक बैठक घेऊन ३१ जानेवारीपर्यंत शिक्षण विभागाने प्रतिपूर्ती न केल्यास प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘मेस्टा’चे जिल्हाध्यक्ष सतीश सांगळे व उपाध्यक्ष दत्तात्रेय माळशिकारे यांनी दिली. 

बैठकीस जिल्हा सरचिटणीस वैभव जगताप, कोशाध्यक्ष रवींद्र पोमणे, बाळासाहेब झगडे, राहुल बनकर, नितीन जाधव, मच्छिंद्र कदम आदी उपस्थित होते.

सरकारकडून २०१७-१८ या वर्षाची पन्नास टक्के, तर २०१८-१९ ची पूर्ण रक्कम येणे बाकी आहे. या दोन वर्षांचे जिल्ह्यातील सुमारे चारशे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे तब्बल पंचेचाळीस कोटी रुपये थकले आहेत. तसेच, २०१९-२० शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी या वर्षाची माहिती मागविली गेली नाही. यामुळे इंग्रजी शाळांचे संस्थाचालक धास्तावले आहेत.

‘एकही शाळा प्रवेश प्रक्रिया राबविणार नाही’
डी. जी. माळशिकारे म्हणाले, ‘‘माझ्या शाळेतील पाचशेपैकी सव्वाशे मुलांच्या दोन वर्षांच्या रकमा सरकारकडे थकल्या आहेत. शिक्षकांचे पगार, इमारतीचे भाडे, पाणीपट्टी, वीजबिल अशा आर्थिक गोष्टी कशा पूर्ण करायच्या? त्याच वर्षात पैसे येणे अपेक्षित असताना अडीच-तीन वर्षे त्या थकल्याने शाळा अडचणीत आहेत. ‘मेस्टा’चे राज्याचे अध्यक्ष संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील एकही शाळा २०२०-२१ ची प्रवेश प्रक्रिया राबविणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com