बळीराजाला साथ द्या

Rameshwar Bhusare
Rameshwar Bhusare

मदतीऐवजी मारहाण सहन कराव्या लागलेल्या रामेश्वर भुसारे या शेतकऱ्याच्या घरी 26 मार्च गेलो होतो. माझ्यासोबत विजय गायकवाड, योगेश वागज, प्रशांत भोसले हेही होते. भुसारे यांची परिस्थिती पाहून अस्वस्थ आणि स्वतःचीच लाज वाटत आहे. प्रतिकुल परिस्थितीत लढण्याच्या जिद्दीला सलाम आहे. सलाम रामेश्वर भुसारे तुम्हाला सलाम!

रामेश्वर हरिभाऊ भुसारे या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतात जानेवारी 2015 मध्ये शेडनेट बसवण्यासाठी स्वतःजवळील आणि मित्रांकडून पैसे घेऊन 10 लाख रूपये खर्च केले. त्या रोपवाटीकेसाठी नियोजनही केले, रोपवाटीकेचे कार्डही छापले. त्यानंतर चांगले उत्पादन घेऊन आपल्या पदरात चार पैसे पडतील या आशेवर असणाऱ्या भुसारे यांनी शेडनेटमध्ये पीक घेण्यास सुरवात केली. परंतु 11 एप्रिल 2015 व 14 एप्रिल 2015 रोजी आलेल्या वादळी वारे व गारपिटीने त्यांचे शेडनेट पिकासहित जमीनदोस्त झाले. 

अस्मानी संकटाने पुरते हादरलेल्या रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून कन्नड तहसीलदार व औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले. त्यानंतर कन्नड तहसीलदारांच्या आदेशाने त्यांच्यासह गावातील इतरांच्या नुकसानीचे पंचनामेही कृषी विभागाकडून करण्यात आले. परंतू वर्ष उलटून गेले, तरीही कोणतीही कार्यवाही होत नव्हती. मंत्र्यांना आपल्या समस्या कळावी म्हणून भूसारे हे गावापासून 35 किलोमीटर कन्नडला येऊन ई-मेल करायचे. सगळ्या मंत्र्यांनी त्यांनी मेल केले. जिल्हा अधिकारी, तहसीलदार कृषी अधिकारी यांच्या सरकारी कार्यालयाच्या चकरा मारून थकलेल्या भुसारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली. 

4 ऑक्टोबर 2016 ला औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकी दिवशी आपल्याला न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यानंतर चारवेळा मंत्रालयात चकरा मारल्यानंतर त्यांना जुन्या नियमाने तुला नुकसान भरपाई देता येणार नाही. तू नवीन शेडनेट उभार त्यासाठी आम्ही बँकेला कर्ज द्यायला लावतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर रितसर बँकेत अर्ज, जामीन हे सोपस्कर पार पाडले. त्यानंतर बँकेने भुसारे यांना 16 लाख 22 हजार 967 प्रकल्प खर्चापैकी 12 लाख 17 हजार 225 इतके बँक कर्ज, तर 4 लाख 5 हजार 742 इतके म्हणजे 25 टक्के रक्कम भरण्यास सांगितले. आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचे घर बघून आम्हाला धक्काच बसला. पत्र्याच्या शेडमध्ये हा बळीराजा राहतोय आणि तोही महिना पाचशे रूपये भाडे देऊन. त्यांचे घर शेतात होते, तेही वादळीवाऱ्यात होत्याचे नव्हते झाले. चार एकर जमीन त्यात केवळ एकरभर भिजेल ऐवढेच पाणी, म्हणजे बागायती क्षेत्र केवळ एक एकर. हा शेतकरी एवढे पैसे कुठून आणणार? 

आपल्याला मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत मिळावी, म्हणून गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करतोय. पण आपली दखलच घेतली जात नाही. म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर भुसारे यांनी आझाद मैदानात उपोषणही केले. मात्र, शासन व्यवस्थेला जाग येत नसल्याने यावर काही तरी मार्ग काढावा, यासाठी रामेश्वर भुसारे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. मात्र, त्यांना जबर मारहाण करून त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. "बळी"राजा रामेश्वर भुसारे यांनी एक लहान मुलगी, एक मुलगा आहे. पत्नी व रामेश्वर भुसारे रोजंदारीने कामाला जातात. केवळ एक एकर भिजेल इतकेच पाणी असल्याने त्यांनी शेडनेट उभारले होते. पावसाने होत्याचे नव्हते केले. आता ज्याला चूल पेटवायची भ्रांत. म्हणून शासनाकडे मदत मागणाऱ्या रामेश्वर भूसारे यांचे काय चुकले? रामेश्वर भुसारे यांचा जगण्याचा हट्टाहास हाच त्यांचा गुन्हा होता काय? गळ्याला फास घेवून जिवन संपवण्यापेक्षा संघर्ष करायचा आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांकडे, "साथ द्या" ही मागणे करणे गुन्हा आहे काय?

मित्रांनो त्यांना खरी गरज आहे ती मानसिक आधाराबरोबरच आर्थिक मदतीची. मला माहिती आहे, की आभाळच फाटल तर आपण कुठे कुठे शिवणार आहोत? आम्ही जेवढे शक्य आहे, तेवढी मदत देण्याचा प्रयत्न करतच आहोत. तुम्ही पहा जमतयं का? थोडासा प्रयत्न करूयात रामेश्वर भूसारे यांच्या जगण्याला, संघर्षाला, जिद्दीला, 
साथ देवूयात. रामेश्वर भुसारे यांचा मोडलेला संसार बघून आम्ही परत यायला निघालो. 

रामेश्वर हरिभाऊ भुसारे (मु.पो. घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) 
संपर्क नंबर - 9673592741
Bank Detailes :
Bank Of Maharashtra
Rameshwar Harishchandra Bhusare
Ac No : 60164336764
IFSC CODE :MAHB0000830

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com