#BrahmosLeak ‘ब्राह्मोस’चा अभियंता जाळ्यात

Brahmos Leak
Brahmos Leak

नागपूर - ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून एकाला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने आज अटक केली. निशांत अग्रवाल असे त्याचे नाव असून, त्याला वर्धा रोड येथील ब्राह्मोस एरोस्पेस सेंटरजवळून ताब्यात घेण्यात आले. 

भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसंबंधीची माहिती निशांत पाकिस्तानला पुरवत असल्याची माहिती पुढे येत आहे.  तो ‘ब्राह्मोस एरोस्पेस’मध्ये कार्यरत होता. त्यामुळे त्याच्याकडे बरीच गुप्त माहिती होती. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियातील ‘एनपीओ मशिनोस्त्रोयेनिया’ यांनी एकत्र येऊन ‘ब्राह्मोस एरोस्पेस सेंटर’ विकसित केले आहे. भारत आणि रशिया यांच्यात १२ फेब्रुवारी १९९८मध्ये झालेल्या करारानुसार ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. निशांत मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे आणि गेल्या चार वर्षांपासून तो येथे कार्यरत आहे. पोलिसांचे पथक आज सकाळी साडेपाच वाजता तो राहत असलेल्या ठिकाणी पोचले, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते तेथे होते.

उत्तर प्रदेशातही छापे
निशांतला आता नागपूरमध्ये न्यायालयात हजर करण्यात येणार असून, नंतर त्याला अधिक तपासासाठी लखनौला नेण्यात येणार आहे. अशाच प्रकारचे छापे कानपूर आणि आग्र्यातही घालण्यात आले. तेथेही प्रत्येकी एकाची चौकशी करण्यात आली. त्यांचे लॅपटॉपही जप्त केले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांचा निशांतशी काही संबंध आहे का हे स्पष्ट होईल.

‘हनी ट्रॅप’
गेल्या अनेक महिन्यांपासून फेसबुकवर महिलांच्या नावाने खोटे खाते तयार करून त्या ‘हनी ट्रॅप’मध्ये भारतातील संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्यांना ओढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईत अशा प्रकारचे दोन फेसबुक ‘आयडी’ उजेडात आले होते. ही दोन्ही खाती पाकिस्तानातून चालविली जात होती. या खात्यांवर निशांत अग्रवालने चॅटिंग केल्याचे उघड झाले. उत्तर प्रदेश ‘एटीएस’ने आज सकाळी निशांतच्या निवासस्थानी छापा घातला. त्या वेळी त्याच्या वैयक्तिक लॅपटॉपमध्ये अतिसंवेदनशील माहिती साठविल्याचे आढळले. सरकारी गोपनीयतेच्या कायद्यानुसार ही माहिती त्याच्या वैयक्तिक संगणकात असणे अपेक्षित नव्हते. गोपनीयतेच्या कायद्याच्या भंगाबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

कोण आहे निशांत अग्रवाल?
 निशांत अग्रवाल हा मूळचा उत्तराखंडच्या रुरकीचा आहे.
 निशांत मेकॅनिकल इंजिनिअर आहे. 
  डोंगरगाव येथील ‘डीआरडीओ’च्या प्रकल्पात तो कार्यरत आहे
  नागपूरच्या उज्ज्वल नगर परिसरातील मनोहर काळे यांच्या घरात निशांत गेल्या चार वर्षांपासून राहत आहे.
  या वर्षी मार्च महिन्यात निशांतचा विवाह झाला.

ब्राह्मोसची वैशिष्ट्ये
  ‘ब्राह्मोस’ हे भारत आणि रशियाच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेले क्षेपणास्त्र आहे.
  हे क्षेपणास्त्र जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते
  हवेतच मार्ग बदलण्याची क्षमता
  अवघ्या १० मीटरच्या उंचीवरून उडण्याची क्षमता
  ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र अमेरिकी टॉमहॉक क्षेपणास्त्राच्या दुप्पट वेगाने वार करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com