ब्रेकिंग! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूसाठी ५ नावे अंतिम; ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाला मिळणार पूर्णवेळ कुलगुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur univercity
ब्रेकिंग! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूसाठी ५ नावे अंतिम; ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाला मिळणार पूर्णवेळ कुलगुरू

ब्रेकिंग! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूसाठी ५ नावे अंतिम; ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाला मिळणार पूर्णवेळ कुलगुरू

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीच्या मुलाखती शनिवार व रविवारी (ता. १७) पार पडल्या. त्यातून पाच जणांची नावे अंतिम करून राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहेत. काही दिवसांतच त्यातील एकाची कुलगुरुपदी निवड घोषित होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा मे २०२३ मध्ये कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर मुंबईच्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्याकडे कुलगुरुपदाची प्रभारी सूत्रे देण्यात आली. त्यांनी तीन महिन्यात वेळेत परीक्षा व निकाल जाहीर होण्यासाठी अथक परिश्रम केले. विद्यापीठात डॅशबोर्ड तयार करून ऑनस्क्रिन मूल्यमापन वेगात व्हावे यासाठीही विशेष प्रयत्न केले. तरीपण, नवीन कुलगुरूंना या विभागावर विशेष काम करावे लागणार आहे.

तसेच ऑनस्क्रिन मूल्यमापन पद्धत ठेवायची की पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच उत्तरपत्रिकांची तपासणी करायची, याचा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे स्वतंत्र जिल्ह्यासाठी स्थापन झालेले राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. कुलगुरुसाठी राज्यभरातील जवळपास २७ जणांनी अर्ज केले होते. मागील दोन दिवसांत मुंबईत त्यांच्या मुलाखती पार पडल्या असून आता पाच जणांची नावे राज्यपालांकडे पाठविली आहेत. त्यातून राज्यपाल एकाची निवड करतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

युवा महोत्सवाचे उद्‌घाटन नवीन कुलगुरू करणार

मुलाखतीचा टप्पा पार पडल्यानंतर बंद लखोट्यात पाच जणांची नावे राज्यपालांकडे गेली आहेत. आता आगामी १० ते १५ दिवसांत त्यातून एकाची निवड होईल. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डॉ. एस. डी. ढोले, जळगाव विद्यापीठाचे डॉ. ए. एम. महाजन यांची नावे या पदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. यांच्यासह अनेकजण यापूर्वी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत होते. पण, राज्यपालांकडून अंतिम निवड कोणाची होणार, कोण कुलगुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.