मुंबईला अस्मानी-सुलतानीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - सरकार, प्रशासनाची सुलतानी आणि पावसाची अस्मानी याचा जबरदस्त फटका मंगळवारी (ता. ३) मुंबईला बसला. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीला एक वर्षही झाले नसताना अंधेरीत लोहमार्गावरील गोखले पुलाचा भाग कोसळल्याने पाच जण जखमी झाले. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई - सरकार, प्रशासनाची सुलतानी आणि पावसाची अस्मानी याचा जबरदस्त फटका मंगळवारी (ता. ३) मुंबईला बसला. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीला एक वर्षही झाले नसताना अंधेरीत लोहमार्गावरील गोखले पुलाचा भाग कोसळल्याने पाच जण जखमी झाले. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

गोखले पुलाच्या दुर्घटनेमुळे पश्‍चिम रेल्वे बंद पडली असतानाच संततधारेमुळे मध्य आणि हार्बर रेल्वेही ठप्प झाली होती, त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वांद्रे येथे एक तरुण नाल्यात वाहून गेला आहे. यातून मुंबई सावरत असतानाच लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमध्ये पुन्हा आगीची ठिणगी पडली. तेथील ट्रेड बिल्डिंगच्या बी विंगमध्ये लागलेली आग अग्निशमन दलाने तत्काळ आटोक्‍यात आणली. त्याच वेळी सांताक्रूझ येथे डबल डेकर बस ओव्हरहेड बॅरिअरला धडकल्याने नुकसान झाले आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेच्या मार्गातील सर्व धोकादायक अडथळे दूर करण्याचे आश्‍वासन सरकारतर्फे देण्यात आले होते; मात्र त्याला वर्ष उलटण्याच्या आतच त्यातील फोलपण उघड झाला. गोखले पुलाचा पादचारी भाग सकाळी कोसळल्याने अंधेरीहून पश्‍चिम रेल्वेची वाहतूक दुपारी अडीच वाजेपर्यंत ठप्प झाली होती. दुपारी अडीचच्या सुमारास अंधेरीवरून हार्बर मार्गावरील पहिली लोकल सोडण्यात आली. हा पूल कोसळल्याने ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे ही वाहतूक बुधवार सकाळपर्यंत पूर्ववत होण्याची शक्‍यता आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या चर्चगेट ते वांद्रे आणि गोरेगाव ते विरार अशी वाहतूक सुरू आहे.

दुसरीकडे रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शीव स्थानकाजवळ पाणी साचून मध्य रेल्वेही काही काळ बंद पडली होती. हार्बर मार्गावरही अशीच परिस्थिती होती. पावसाचा जोर ओसरल्यावर लोकल वाहतूक सुरू झाली असली, तरी गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. 

मुंबईवर कहर 
- अंधेरीत रेल्वे फलाटावर पूल कोसळून पाच जखमी; एक अत्यवस्थ 
- पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प 
- रस्ते जाम 
- सांताक्रूझ येथे डबल डेकर बस बॅरियरवर आदळली 
- कमला मिलमध्ये शॉर्टसर्किट 
- वांद्रे येथे एक तरुण नाल्यात वाहून गेला

घोषणा आणि आरोप-प्रत्यारोप
मुंबईतील सुमारे ४५० रोड ओव्हर ब्रिज व फूट ओव्हर ब्रिजचे रेल्वे सेफ्टी ऑडिट करणार ः गोयल
रेल्वे, बृहन्मुंबई महापालिका व आयआयटी मुंबई हे काम करणार
अंधेरी दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची भरपाई देणार
रेल्वे पुलांसाठी महापालिका निधी देते. रेल्वे पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचे अहवाल खोटे सादर केले का? ः महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर

Web Title: Bridge Collapsed In Andheri Station Mumbai Western Railway Line