चिकनपेक्षा वांगी महाग!

राजकुमार घाडगे
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नवी पेठ भाजी बाजारात बुधवारी पंढरपुरी देशी वांग्याचा दर एका किलोला १०० ते १२० रुपये होता, तर पोल्ट्रीचालकांकडून चिकन विक्रेत्यांना सध्या ७० ते ९० रुपये प्रतिकिलो ठोक दराने ब्रॉयलर कोंबडीची विक्री केली जात आहे. मागील काही दिवसांपासून चिकनपेक्षा देशी वांग्याला जादा दर मिळत असल्याचे विरोधाभासी चित्र पाहावयास मिळत आहे.

चिकन ९० रुपये तर देशी वांगे १२० रुपये किलो
पंढरपूर - नवी पेठ भाजी बाजारात बुधवारी पंढरपुरी देशी वांग्याचा दर एका किलोला १०० ते १२० रुपये होता, तर पोल्ट्रीचालकांकडून चिकन विक्रेत्यांना सध्या ७० ते ९० रुपये प्रतिकिलो ठोक दराने ब्रॉयलर कोंबडीची विक्री केली जात आहे. मागील काही दिवसांपासून चिकनपेक्षा देशी वांग्याला जादा दर मिळत असल्याचे विरोधाभासी चित्र पाहावयास मिळत आहे. 

श्रावण महिना सुरू असल्याने बहुतांश लोक मांसाहाराचे सेवन टाळतात, त्यामुळे साहजिकच शाकाहारी लोकांकडून फळभाज्या व भाजीपाल्याला श्रावणात मोठी मागणी असते. मात्र ऐन पावसाळ्यातही पंढरपूर तालुक्‍यात पाऊस पडला नसल्याने पाण्याच्या कमतरतेमुळे भाज्यांचे उत्पादन घटले आहे, तर भीमा नदीला येवून गेलेल्या पुरामुळे तालुक्‍यातील नदीकाठावरील बागायती भागातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. आवक कमी असली तरी मागणी वाढल्याने सर्वच फळभाज्या व भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

याउलट श्रावण महिन्यात मांसाहाराला खवय्ये लोकांकडून मागणी कमी झाल्याने पोल्ट्री चिकनचे दर गडगडले आहेत. सध्या पोल्ट्री चालकांकडून चिकन विक्रेत्यांना ७० ते ९० रुपये प्रतिकिलो ठोक दराने ब्रॉयलर कोंबडीची विक्री केली जात आहे. तर, भाजी बाजारात पंढरपुरी देशी वांगी २५ ते ३० रुपये पाव किलो या दराने विकली जात आहेत. म्हणजे सर्व भाज्यांत देशी वांगी भाव खात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brinjal more expensive than chicken