नेदरलँडमधील उणे १७ डिग्री तापमानात महाराष्ट्राची गुढी

आशिष ठाकरे
रविवार, 18 मार्च 2018

विदेशात राहत असताना भारतीय सण आणि त्याचदिवशी तयार होणारे खाद्यपदार्थ याबाबत नेहमीच उणीव भासत होती. परंतु, प्रथम सर्वांनी एकत्र येत सण साजरे करण्यास सुरवात केली असून, आता महाराष्ट्रीय चवही चाखण्यास मिळत आहे. 
- ॲड. प्रणिता अद्वैत देशपांडे, हेग, नेदरलँड.

बुलडाणा - गुढीपाडवा हा एक दाक्षिणात्य सण असून, तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.  मराठी मातीसोबत असलेली नाळ कायम ठेवत विदेशात वास्तव्यास असल्यानंतर भर थंडीत नेदरलँड येथील द हेग सिटीमध्ये उणे १७ डिग्री तापमानात अकोल्याचे माहेर असलेल्या जालना येथील ॲड. प्रणिता अद्वैत देशपांडे यांनी आज (ता.१८) सकाळी तेथील वेळप्रमाणे १०.३० वाजता महाराष्ट्रीयन वेशभूषेत गुढी उभारली.  

गेल्या काही वर्षापूर्वी अद्वैत देशपांडे हे कामानिमित्त नेदरलँडमध्ये स्थायिक झाले आहे. भारतीय संस्कृतीला विदेशात असलेले महत्त्व आणि आजही सणाची असलेली तेथील क्रेझ ही विदेशात सर्व देशवासीयांना एकत्र ठेवण्यासाठी मोठा आधार आहे. यामुळे भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा नेदरलँड येथे असतानाही मोठ्या उत्साहाने ॲड. प्रणिता देशपांडे यांच्या पुढाकारातून येथील महाराष्ट्रीय बांधव साजरे करत आहेत.

महाराष्ट्रात नागरिक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. परंतु, सध्यास्थितीत नेदरलँड कडाक्‍याची थंडी पडत असून, तापमान हे उणे १७ डिग्री असतानाही घरामध्ये गुढी उभारून एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. जगामध्ये शांततेचे प्रतिक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या एक हेग सिटीमध्ये नेहमीच भारतीय संस्कृतीवर आधारित वेगवेगळ्या उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. नेदरलँडमध्ये राहून मराठी मंडळांकडूनही वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. मराठी सण म्हटले की गोड आणि पारंपरिक पदार्थाची चव आलीच आणि त्यातही पुरणपोळी ही नेहमीच सर्वांच्या आवडीची परंतु, परदेशात पुरणपोळी कशी मिळणार असा प्रश्‍न येथील महाराष्ट्रीय नागरिकांना पडला. परंतु, यावर पुढाकार घेत ॲड. प्रणिता देशपांडे व मैत्रिण जुही शर्मा यांच्या माध्यमातून खास गुढी पाडव्यापासून पुरणपोळी उपलब्ध करून देत खऱ्या जन्मभूमीचा वसा कर्मभूमीमध्ये कायम ठेवत भारतीय संस्कृतीला टिकविण्याचे काम केले आहे.

Web Title: buldhana news gudi padwa celebrate in netherland