वऱ्हाडात गारपिटीचा पुन्हा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही पुन्हा नुकसान

विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही पुन्हा नुकसान
बुलडाणा - रविवारी झालेल्या गारपिटीचे पंचनामे होत नाहीत तोच आज मंगळवारी जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली व मेहकर तालुक्‍यांना गारपिटीने पुन्हा तडाखा दिला. जिल्हाभरातील सुमारे 50 गावांमध्ये या गारपिटीचा तडाखा बसला आहे. काही भागांत सायंकाळी उशिरा गारपीट सुरू झाल्याने नेमका नुकसानीचा अंदाज कळू शकला नाही. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍यातील 30 गावांत आणि मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणीही आज गारपीट झाली.

चिखली आणि मलकापूर तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये गारपीट झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. रविवारी (ता. 11) शहर आणि तालुक्‍यात झालेल्या तुफान गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे शासकीय पातळीवर काही ठिकाणी सर्वेक्षण सुरू झालेले असताना आज शहर आणि परिसरात पुन्हा लहान आकारांच्या गारांसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीमध्ये आणखीनच भर पडली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी चिखली तालुक्‍यातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करून पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राजुरा, वरोरा तालुक्‍यांत सर्वाधिक फटका
चंद्रपूर - सोमवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या सुमारास गारपिटीसह आलेल्या पावसाचा वरोरा, राजुरा तालुक्‍यांतील गावांना तडाखा बसला. हजारो हेक्‍टर क्षेत्रांवरील हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले. चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, गोंडपिंपरी, मूल, पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही, राजुरा, कोरपना, जिवती आणि बल्लारपूर येथे जवळपास तासभर पाऊस सुरू होता. राजुरा तालुक्‍यातील मारडा, धिडशी, निर्ली या गावांमध्ये गारपीट झाली. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. गारपिटीत अनेक पक्षीही मृत्युमुखी पडले. गारपिटीचा हरभरा, गहू आणि कापसाला मोठा फटका बसला. वरोरा तालुक्‍यातील चरूर (खटी), एकोना, वनोजा, मार्डा, चिनोरा, सालोरी, आबामक्ता, वडगाव, चारगाव, निमसडा, शेगाव यासह अन्य काही गावांना गारपिटीचा तडाखा बसला.

बीड, उस्मानाबाद, लातूरला तडाखा
बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील काही भागांत आजही गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला. परळी वैजनाथ तालुक्‍यात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गाराही पडल्या. ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह व्यापारी, यात्रेकरूंची मोठी तारांबळ उडाली. रात्री आठच्या सुमारासही शहर व परिसरात पुन्हा विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. केज तालुक्‍यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. अंबाजोगाई तालुक्‍यात गारपीट झाली, तर धारूरमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या.

उस्मानाबादेत तिसऱ्या दिवशीही पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्‍यांतील अनेक भागात सलग तिसऱ्या दिवशी आज पहाटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दोन दिवसांत 30 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लातूर जिल्ह्याला फटका
लातूर जिल्ह्यात दोन दिवसांत जिल्ह्यात सरासरी 15.87 मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांना मात्र मोठा फटका बसला आहे. यात उदगीर तालुक्‍यात सर्वाधिक 24.57, तर औशात सर्वांत कमी 1.43 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. आज महाशिवरात्रीची सुटी असतानाही पंचनामे करण्याचे काम सुरू होते. जिल्ह्यात वीज पडून एक मुलगी जखमी झाली, तर वीज पडून एक गाय व म्हशीचा मृत्यू झाला आहे.

Web Title: buldhana news vidarbha news hailstorm loss agriculture