मुख्य सचिवांचा दणका

- दीपा कदम
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - राज्याचे नवीन मुख्य सचिव सुमित मलिक यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्या बरोबर ताबडतोब विभागांच्या सचिवांना दणका दिला आहे. विधानसभा अधिवेशनाला सर्व सचिवांनी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले असून, दांडी बहाद्दर सचिवांना मुख्य सचिवांनी आदेश काढून काटेकोर अंमलबजावणीसाठी कानपिचक्‍या दिल्या आहेत. तसेच अधिवेशनात उपस्थितीत करण्यात आलेल्या प्रश्‍नांवर किंवा बाबींवर ठराविक काळात अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाल्यास सचिवांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही मलिक यांनी दिले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (ता. 6) सुरू होत आहे. दोनच दिवसांपूर्वी मलिक यांनी मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला असून, पदभार स्वीकारल्याबरोबर त्यांनी सनदी अधिकाऱ्यांपासूनच शिस्तीचा धडा शिकवायला सुरवात केली आहे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह सुरू असताना विरोधकांकडून प्रश्‍नांची सरबत्ती सुरू होते किंवा मंत्र्यांना काही माहिती तत्काळ उपलब्ध करून हवी असते. मात्र संबंधित विभागाच्या सचिवांचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सभागृहात पत्ताच नसतो. अनेकदा मंत्र्यांना माहिती नाही किंवा सचिव उपस्थित नाहीत म्हणून विरोधक सभागृहाचे कामकाज रोखून धरत असल्याने सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढावते. अशी परिस्थिती सरकारवर येऊ नये याची दक्षता पदभार सांभाळल्याबरोबर मलिक यांनी घेण्यास सुरवात केली आहे. राज्य सरकारच्या संसदीय कार्य विभागामार्फत मलिक यांनी काढलेल्या आदेशामध्ये अधिवेशन काळात राज्यातील सर्व विभागांच्या सचिवांची उपस्थिती मुंबईत तसेच आवश्‍यकता असेल त्या वेळीस विधान मंडळाच्या सभागृहाच्या गॅलरीतदेखील अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी अधिवेशनाच्या काळात मुंबईबाहेर दौऱ्यावर जाणे भाग पडल्यास मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या पूर्वपरवानगीनेच जाता येणार आहे.

अधिवेशनाच्या काळात तारांकित अतारांकित प्रश्‍न, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, औचित्याचे मुद्दे, विशेष उल्लेख या संसदीय आयुधांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्‍नांवर ठराविक कालावधीत कार्यवाही होणे अपेक्षित असते. मात्र त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने सदस्यांकडून नाराजी व्यक्‍त केली जात असल्याकडेही मलिक यांनी लक्ष वेधले आहे. अधिवेशनात उपस्थित केलेल्या बाबींची परिपूर्ण आणि सर्वसमावेशक उत्तरे द्यावीत, तसेच विहित मुदतीतच त्याची उत्तरे सदस्यांनाही द्यावीत याची सर्व सचिवांनी व्यक्‍तिश: दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत.

Web Title: bump by chief secretary