भंडारा-गोंदियातील 49 केंद्रांवर आज फेरमतदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

भंडारा-गोंदियासाठी फेरमतदानाचा निर्णय घेतानाच आयोगाने राज्य सरकारला गोंदियाचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, राज्य सरकारने त्यांची बदली केली असून नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांची गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

मुंबई - मतदानयंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट यंत्राविषयीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 49 ठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदियातील संबंधित केंद्रांवर आज (बुधवार) सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळेत फेरमतदान होईल. मतमोजणीच्या तारखेत बदल करण्यात आलेला नाही. 

भंडारा-गोंदियासाठी फेरमतदानाचा निर्णय घेतानाच आयोगाने राज्य सरकारला गोंदियाचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, राज्य सरकारने त्यांची बदली केली असून नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांची गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले होते. मतदाना वेळी ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या तक्रारी मतदार; तसेच राजकीय पक्षांनी केल्या होत्या. पालघरमध्ये सदोष यंत्रे तातडीने बदलून मतदान घेण्यात आले होते. मात्र, भंडारा-गोंदियात सदोष यंत्रे बदलण्यात आली नाहीत. जवळपास 400 मतदान केंद्रांवर यंत्रे बदलूनही मतदानाविषयी तक्रारी होत्या; तर काही ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले नाहीत. भंडारा-गोंदियात यंत्रे बदलण्यात न आल्याने काही मतदान केंद्रावर शून्य टक्के मतदान झाले होते. मतदानयंत्र काम करत नसल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाला होता. 

Web Title: bypoll in Bhandara-Gondia-49 centers