सायबर हल्ले आणि वनवे रोखण्यासाठी सी-डॅकच्या दोन नवीन प्रणाली विकसित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CDAC

वाढते सायबर हल्ले आणि देशातील वनात सातत्याने होत असलेल्या वनव्याच्या घटना रोखण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) पुढाकार घेतला आहे.

C-Dac : सायबर हल्ले आणि वनवे रोखण्यासाठी सी-डॅकच्या दोन नवीन प्रणाली विकसित

पुणे - वाढते सायबर हल्ले आणि देशातील वनात सातत्याने होत असलेल्या वनव्याच्या घटना रोखण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) पुढाकार घेतला आहे. आर्थिक व्यवहार आणि वनसंरक्षणाबाबत महत्त्वाच्या ठरणार असलेल्या या दोन्ही प्रणालींची घोषणा मंगळवारी (ता. २१) सी-डॅकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात आली.

सायबर धोक्याचे निरीक्षण, विश्लेषण आणि ते रोखण्यास सक्षम करणारे ‘हनीपॉट फ्रेमवर्क’ आणि उपग्रह व वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वनव्याची माहिती देणारी ‘फायर स्प्रेड सिम्युलेशन सिस्टिम’ या दोन प्रणाली सी-डॅक विकसित केल्या आहेत. सी-डॅकचे महासंचालक ई. मगेश यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कार्यकारी संचालक कर्नल ए. के. नाथ (निवृत्त) या वेळी उपस्थित होते.

काय आहे ‘हनीपॉट फ्रेमवर्क’ :

‘हनीपॉट फ्रेमवर्क’ या प्रणालीद्वारे सायबर धोक्यांचे निरीक्षण, विश्लेषण केले जाणार आहे. तसेच हल्लेखोरांचे वर्तन समजून घेऊन त्याचा अभ्यास करण्यास मदत करते. दोन वर्षे या प्रणालीची प्रायोगिक स्तरावर चाचणी घेण्यात आली. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्जवर आधारित ही प्रगत स्वरुपातील प्रणाली देशभरातील दोन हजार ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.

अशी काम करेल स्प्रेड सिम्युलेशन सिस्टिम :

जंगलात लागणाऱ्या वनव्यांमुळे होणारे वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी ‘फायर स्प्रेड सिम्युलेशन सिस्टिम’ ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. उपग्रहाकडून मिळालेली माहिती आणि वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वणवा पुढील ४८ तासांपर्यंत जंगलातील किती भागात पसरू शकतो याचा अंदाज ही प्रणाली वर्तवते. त्यानुसार तातडीने उपाययोजना हाती घेता येऊ शकतात. सिक्कीममध्ये या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. सिक्किमचा माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, आयआयटी खरगपूर यांच्या सहकार्याने या प्रणालीची निर्मिती करण्यात आली.

वर्धापनदिनाच्या कार्यक्रम बुधवारी :

सी-डॅकचा ३६ वा वर्धापन दिन कार्यक्रम बुधवारी (ता. २२) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात 'हनीपॉट फ्रेमवर्क', 'फायर स्प्रेड सिम्युलेशन सिस्टिम' यासह सॉफ्टवेअर सुरक्षेवर आधारित अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा सुरक्षा प्रशिक्षण साहित्य सादर करण्यात येणार आहे.

सी-डॅकचा शैक्षणिक, संशोधन आणि विकास संस्था, स्टार्टअप आणि उद्योगांना नागरिकांच्या फायद्यासाठीची उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी नेहमी पुढाकार आहे. सी-डॅकचे पदव्युत्तर अभ्यासक्रम आतापर्यंत नॅशनल स्कील करिक्युलम फ्रेमवर्कवर (एनएसक्युएफ) आधारित होते. आता या अभ्यासक्रम नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कनुसार करण्यात आले आहेत. तसेच अभ्यासक्रमांना नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगची (एनसीव्हीईटी) संलग्नता प्राप्त करण्यात आली आहे.

- कर्नल ए. के. नाथ (निवृत्त), कार्यकारी संचालक, सी-डॅक