
शिंदेंच्या नादाला लागू नका, ते सगळचं काढतील; भाजप नेत्याचा ठाकरेंना गर्भित इशारा
महाराष्ट्रावरचे विघ्न दूर झाले आहे, गेली अडीच वर्ष महाराष्ट्रावर संकट आले होते. पण आता ते नाहीय. हे सरकार चांगले काम करत असून, एकनाथ शिंदेंच्या मागे लागू नका ते एकदिवस सगळं काढतील. त्यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यांना डिवचू नका. त्यांच्याकडे सगळं आहे, असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी ठाकरेंना दिला आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असून, यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वातच होणार असल्याचेही राणे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंकडे कोणते विचार?
दसरा मेळाव्यावर बोलताना राणे म्हणाले की, दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेचाच होणार, उद्धव ठाकरेंकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? त्यामुळे एकनाथ शिंदे यांचाच मेळावा होणार असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, बाळासाहेबांचं काय गुण आहेत? असा प्रश्नदेखील उपस्थित केला. जे घडलं ते योग्यचं घडलं असे म्हणत यामागे खूप कारणं असून, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचे ते म्हणाले.
दसरा मेळावा शिंदेंचाच
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना कुणाची या प्रश्नावर अद्यापर्यंत ठोस असे उत्तर मिळालेले नाही. सध्या हा वाद सुप्रीम कोर्टात असून, त्यावर अद्यापपर्यंत अंतिम निर्णय येणे बाकी आहे. मात्र, त्याआधी दरवर्षी दसऱ्याला होणारा शिवसेनेचा मेळावा नेमका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेला दसरा मेळावा नेमका उद्धव ठाकरे घेणार की एकनाथ शिंदे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई मबापालिकेला दोन पत्र देण्यात आली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पालिकेकडून याबाबतचा निर्णय होल्डवर ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर यावर निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण महापालिका सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी दिले आहे.