मंत्रिमंडळातील फेरबदलावरून चर्चेला ऊत 

मंत्रिमंडळातील फेरबदलावरून चर्चेला ऊत 

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य खांदेपालटाच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काहींची धाकधूक वाढली असून, अनेक इच्छुकांना हुरहुर लागली आहे. विद्यमान मंत्र्यांची कामगिरी तपासून काहींना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे, तर काहींचे पंख छाटण्याचे कामही केले जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्यातील खांदेपालटाला वेग येणार आहे. राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यानंतर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खांदेपालट होणार आसल्याचे सांगितले जाते. 

मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन मार्च 2017 मध्ये खांदेपालट आणि विस्तार केला जाईल, असे विधान फडणवीस यांनी एक वर्षापूर्वी दिल्लीत केले होते. त्याला कारणही तसे होते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. महापालिका, जिल्हा परिषदांच्या निकालावरून पालकमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कामगिरीवरून त्यांचे "प्रमोशन', "डिमोशन' किंवा थेट बाहेरचा रस्ता दाखविणे हे सूत्र त्यामागे होते; मात्र या निवडणुकांत भाजप राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला. त्यामुळे काही जण वाचले. परिणामी विस्तार, खांदेपालट लांबणीवर पडला; अन्यथा मंत्रिमंडळाचा विस्तार मार्चमध्ये अधिवेशनापूर्वीच झाला असता. 

या विस्तारात काही जणांना धक्का बसणार आहे. भाजपच्या राज्यमंत्र्यांना बढती मिळणे तसे अवघड आहे; परंतु काही जणांना घरचा रस्ता दाखवला जाईल. एकापेक्षा जास्त खाती असलेल्या मराठवाड्यातील एका मंत्र्याकडील तुलनेने कमी महत्त्वाचे खाते काढून एखाद्या नवख्या महिलेला संधी देण्यात येणार असल्याचे समजते, तर मराठवाड्यातील आणखी एका मंत्र्याला नवीन खात्याचे "बक्षीस' देण्यात येणार आहे; मात्र हे खाते देताना मुंबई-कोकण पट्ट्यातील एका वजनदार मंत्र्याचे खाते काढून त्याचे पंखही छाटण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. भाजपच्या राज्यमंत्र्यांपैकी अपवाद वगळता इतर मंत्र्यांचे "प्रमोशन' होण्याची शक्‍यता कमीच आहे. घरी जाण्याची शक्‍यताच अधिक आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा समावेश होणे नजीकच्या काळात अवघड आहे. राज्यातील निवडणुकांचा निकाल भाजपच्या विरोधात गेला असतात, तर खडसे यांचा समावेश वेगाने झाला असता. नवीन चेहरे म्हणून देवयानी फरांदे, आशिष शेलार, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेचं मात्र दमानं ! 
विधान परिषदेचे सदस्य असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर त्याच पक्षाचे आमदार नाराज असल्यामुळे नेतृत्वाकडून ताबडतोब कारवाई होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे आमदार डोईजड ठरले, असा राजकीय संदेश जाईल. हे शिवसेनेच्या नेतृत्वाला ठाऊक आहे. योग्यवेळी फडणवीस यांच्याकडे शिवसेनेकडून नवीन नावे दिली जातील अथवा काही नावांवर फुल्या मारल्या जातील. त्यामुळे जयप्रकाश मुंदडा व सुजित मिणचेकर किंवा राजेश क्षीरसागर यांच्यापैकी एकाला हमखास संधी मिळण्याची शक्‍यता आहे, तर राज्यमंत्र्यांपैकी विजय शिवतारे यांना "प्रमोशन'ची जास्त संधी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com