पाहावे तेवढे भरावे!

समीर सुर्वे/कृष्ण जोशी
रविवार, 13 जानेवारी 2019

केबल टीव्ही... घरात नळातून येणारे पाणी, वायरमधून येणारी वीज जेवढी जीवनावश्‍यक, तेवढीच जीवनावश्‍यक असते ती ही केबल. तिची सोबत नसेल, तर लोकांना जेवणही नीट जात नाही म्हणतात. पण मध्यंतरी ट्रायचे (म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे) नवे नियम आले आणि अनेकांना ठसकाच लागला की, आता या केबलचे काय होणार? आपल्या दहा बाय दहाच्या दिवाणखान्यातलं मनोरंजन स्वस्त होणार की महागणार? ट्रायचे म्हणणे असे की स्वस्त होणार. केबलचालक म्हणतात की महागणार. (त्यांचे म्हणणेही सोबत दिले आहे.) पण नेमके होणार तरी काय?

केबल टीव्ही... घरात नळातून येणारे पाणी, वायरमधून येणारी वीज जेवढी जीवनावश्‍यक, तेवढीच जीवनावश्‍यक असते ती ही केबल. तिची सोबत नसेल, तर लोकांना जेवणही नीट जात नाही म्हणतात. पण मध्यंतरी ट्रायचे (म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे) नवे नियम आले आणि अनेकांना ठसकाच लागला की, आता या केबलचे काय होणार? आपल्या दहा बाय दहाच्या दिवाणखान्यातलं मनोरंजन स्वस्त होणार की महागणार? ट्रायचे म्हणणे असे की स्वस्त होणार. केबलचालक म्हणतात की महागणार. (त्यांचे म्हणणेही सोबत दिले आहे.) पण नेमके होणार तरी काय?

‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी काही प्रातिनिधिक केबल ग्राहकांशी बोलून, त्यांच्या आवडीनिवडी, ते पाहात असलेल्या वाहिन्या, त्यासाठीचा खर्च यांचा अंदाज घेऊन या गोंधळाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्या पाहणीचा निष्कर्ष असा की, येत्या फेब्रुवारीपासून जे नवे नियम लागू होणार आहेत त्यांच्यामुळे केबलचा मासिक खर्च ५७८ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तो कसा? 

केबलचे किमान भाडे असते १५४ रु. याचा अर्थ असा की, किमान १५४ रुपयांमध्ये १०० मोफत वाहिन्या ग्राहकांना पुरविणे हे केबल ऑपरेटरवर बंधनकारक आहे. पण लोकांना हवे असते माहिती आणि मनोरंजन. त्यामुळे या १०० वाहिन्यांतल्या अनेक वाहिन्यांकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. केबल ऑपरेटरनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांचा अंदाज घेतल्यास असे दिसते की, ग्राहकांना किमान ५० वाहिन्या अतिरिक्त घ्याव्या लागतील. यातील ४६ वाहिन्या आहेत सशुल्क. बाकीच्या सहा-सात मोफत आहेत. या सशुल्क वाहिन्यांचे मासिक शुल्क ३१० रुपये ५० पैशांपर्यंत पोहचते. त्यावर किमान शुल्क, अतिरिक्त शुल्क आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) असे मिळून हा खर्च ५७८.७९ रुपयांपर्यंत जातो. 
आता कसे आहे? आता ग्राहकांना वाहिन्यांचा गुच्छ मिळतो. ३५० ते ४५० रुपयांत तीन-चारशे वाहिन्या पाहायला मिळतात. ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार यापुढे प्रत्येक वाहिनी स्वतंत्र घ्यावी लागणार आहे. प्रत्येक वाहिनीसाठी शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजे आता मनोरंजनही महागणार आहे. अर्थात, यावर एक उपाय आहे. वाहिन्यांच्या संख्येत कपात करण्याचा...

ट्राय म्हणते - हा फायद्याचा सौदा!
सुरुवातीच्या १०० वाहिन्यांसाठी ग्राहकांना किमान १५३ रुपये ४० पैसे भरावे लागतील. त्यातही काही महिन्यांत ५४९ निःशुल्क वाहिन्यांपैकी हव्या त्या वाहिन्या निवडण्याचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. सध्या राज्यातील प्रमुख शहरांत केबल सेवेसाठी ३५० ते ४५० रुपये मोजावे लागतात. या शुल्कात सुमारे ३५० वाहिन्या दाखवल्या जातात. त्यापैकी बहुसंख्य वाहिन्या ग्राहक पाहत नाहीत. ब्रॉडकास्टर ऑडियन्स रिसर्च कॉन्सिलने (बीएआरसी) केलेल्या सर्वेक्षणात ९० टक्के केबल ग्राहक ५० पेक्षा कमी वाहिन्या पाहतात. गरज नसतानाही त्यांना सर्व वाहिन्यांचे पैसे द्यावे लागतात. मात्र, आता त्यांच्या आवडीनुसार वाहिन्या निवडता येणार असून तेवढचे पैसे द्यावे लागतील, असे ट्रायचे म्हणणे आहे. केबल सेवा स्वस्त होईल, या ट्रायच्या दाव्याला महाराष्ट्र केबल ऑपरेटर फेडरेशननेही दुजोरा दिला आहे.

ग्राहकांनी योग्य पद्धतीने वाहिन्यांची निवड केल्यास पूर्वीपेक्षा कमी दरात त्या पाहता येतील. मात्र, ही नवी नियमावली समजून त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी काही महिने जावे लागतील.
- अरविंद प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र केबल ऑपरेटर फेडरेशन

थोडक्‍यात महत्त्वाचे...
  मोफत आणि सशुल्क वाहिन्यांचा एकाच गुच्छात समावेश नसेल 
  एसडी आणि एचडी वाहिन्यांचा समावेश एकाच गुच्छात नसेल 
  १९ रुपयांपेक्षा जास्त शुल्क असलेली वाहिनी गुच्छात नसेल 
  वाहिन्यांचे शुल्क ५० पैशांपासून १९ रुपयांपर्यंत असेल 

सध्याचे केबलचे अर्थकारण 
३०० रु.  ५०० चॅनेलच्या पॅकेजची ग्राहकांना पडणारी किंमत 
१३० रु.  केबलचालक हेच पॅकेज एमएसओकडून खरेदी करतानाची किंमत 
६० ते ७० रु.  एमएसओ हेच पॅकेज चॅनेलकडून खरेदी करतानाची किंमत 
६०० ते ७०० रु.  नव्या रचनेत ग्राहकांचे होणारे संभाव्य दरमहा बिल 
२० ते २५ रु. सध्याच्या दररचनेत बड्या वाहिन्यांचे दर -
५० ते ६० रु. नव्या रचनेत प्रत्येक बड्या वाहिन्यांनी दिलेले वाहिनीगुच्छाचे दर.

केबलच्या नव्या (फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या) दररचनेमुळे केबल ग्राहकांवर दुप्पट भार पडणार आहे, तर केबलचालकांचा प्रशासकीय व्याप प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत बहुसंख्य केबलचालक आपला धंदा विकून बाहेर पडतील. 
- तुषार आफळे, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची केबल संघटना.

गुच्छ बंद 
ट्रायकडे उपग्रह वाहिन्यांच्या मालकांनी यापूर्वीच दरपत्रक दिले आहे. त्यांच्याकडील नोंदीनुसार सध्या ३२९ सशुल्क आणि ५४९ निःशुल्क वाहिन्या आहेत. पूर्वी उपग्रह वाहिन्यांचे गुच्छ बनवून ग्राहकाला विकले जात असे. त्यात अनेक निःशुल्क वाहिन्यांचाही समावेश असायचा. मात्र, आता प्रत्येक वाहिनी स्वतंत्रपणे पुरवावी लागेल. त्यानुसारच शुल्क आकारता येईल. 

निवडीची संधी केव्हाही 
उदाहरणार्थ - मे महिन्यात क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी आतापासूनच या स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीची निवड करण्याची गरज नाही. मे महिन्यात तिची निवड करता येईल. ही स्पर्धा संपल्यानंतर ती पुन्हा बंद करता येईल. ज्या काळात वाहिनीवरील कार्यक्रम पाहिले, तेवढ्याच कालावधीचे पैसे मोजावे लागतील. 

केबलचालकांचे म्हणणे - भाव वाढणार
या नव्या नियमावलीमुळे केबलचालकांचे प्रशासकीय काम वाढणार आहे. त्यांना प्रत्येक ग्राहकाच्या चॅनेलच्या नोंदी ठेवण्याचे किचकट काम करावे लागेल. केबलचालकांचा नफा कमी होईल. ट्रायच्या आदेशानुसार ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांमधील ८० टक्के वाटा ब्रॉडकास्टरना व उरलेला २० टक्के वाटा एमएसओ आणि केबल ऑपरेटरना मिळणार. ग्राहकांना मात्र यात दरवाढीचा फटका बसेल.

Web Title: Cable Rate Issue Customer Entertainment