जिल्हाधिकाऱ्यांच्या एका फोनने बाळावर झाली शस्त्रक्रिया

A call from the district collector gave life to the child
A call from the district collector gave life to the child

यवतमाळ : डॉक्टरांनी 13 महिन्यांच्या बाळावर ’कोलोस्टॉमी’सारखी महागडी शस्त्रक्रिया करायला सांगितली. जवळ दमडीही नाही. त्यामुळे पित्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पित्याची वेदना समजून घेत नागपूरच्या डॉक्टरांना एक फोन केला. ’निधीच्या मंजुरीसाठी प्रशासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेची वाट न पाहता आधी त्या बाळावर शस्त्रक्रिया करा’ असे त्यांनी आश्‍वस्त केले. नागपूर येथील गेटवेल रुग्णालयातील पिडियाट्रीक डॉ. जितेंद्र हजारे यांनी त्या बाळावर 24 तासांत यशस्वी शस्त्रक्रिया केली. संवेदनशील जिल्हाधिकार्‍यांच्या एका फोनने आपल्या बाळाला जीवनदान मिळाले, ही भावना त्या बाळाच्या आईवडिलांना कृतज्ञ करून गेली.

बाभूळगाव तालुक्यातील दाभा (पहूर) येथील शीतल व दीपक गणेशकर यांना 13 महिन्यांपूर्वी मुलगा झाला. परंतु, जन्मल्यापासूनच त्याला शौचाचा त्रास होता. त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यांनी यवतमाळच्या डॉक्टरांना दाखविले. त्यांनी बाळावर ‘कोलोस्टॉमी’ ही शस्त्रक्रिया तातडीने करावी लागणार असल्याचे सांगितले. केसकर्तनाचा व्यवसाय करणार्‍या दीपककडे पैशाची तरतूद नव्हती. मात्र, त्यांना जिल्हाधिकारीच याप्रकरणी मदत करू शकतात, असा विश्‍वास होता. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची मंगळवारी (ता. 28) भेट घेतली.

जिल्हाधिकार्‍यांना एका पित्याची वेदना कळली. त्यांनी वेळ न घालवता तातडीने गेट वेल हॉस्पिटलचे पिडियाट्रीक सर्जन डॉ. जितेंद्र हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यांना महात्मा फुले जनआरोग्य अभियानांतर्गत शस्त्रक्रियेसाठी शासकीय निधी उपलब्ध करून देईल, परंतु तोपर्यंत कागदपत्रांच्या पूर्ततेची वाट न पाहता शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्यांच्या एका फोनने डॉक्टरांनी अवघ्या चोवीस तासांत बुधवारी (ता. 29) मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे बाळाला जीवदान मिळाले.

शस्त्रक्रिया होईपर्यंत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख स्वत: डॉक्टरांच्या संपर्कात होते. शस्त्रक्रिया झाल्यावर डॉ. हजारे यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितल्यावर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या चेहर्‍यावर समाधानाची लकेर उमटली. यासाठी जिल्हाधिकार्‍यांचे स्वीय सहाय्यक अतुल देशपांडे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ. मारू यांनी सहकार्य केले.  

''बाळाची प्रकृती खालावत असल्याने काय करावे, हे आम्हाला सूचत नव्हते. अशातच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेतली. आपुलकीने संवाद साधत त्यांनी आम्हाला धीर दिला. तज्ज्ञ डॉक्टरांशी स्वत: बोलले. नागपुरात गेल्यानंतर कायम त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवला. शस्त्रक्रिया झाल्याने मुलाला जीवदान मिळाले. जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूतापेक्षा कमी नाहीत''.

- शीतल गणेशकर (आई), मु. पो.  दाभा (पहूर) ता. बाभूळगाव जि. यवतमाळ.

''यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घातले. त्या बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जनआरोग्य अभियानांतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत आश्‍वस्त केले. त्यामुळे बाळावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया मोठी व गुंतागुंतीची असल्याने पिडियाट्रीक सर्जनच करू शकतो.''

डॉ. जितेंद्र हजारे, पिडियाट्रीक सर्जन, गेट वेल हॉस्पिटल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com