आता ‘दंगल’ पडद्यामागे 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

मुंबई - परस्परांवर शाब्दिक हल्ले व व्यक्तिगत ‘शालजोडी’ लगावत आरोप व प्रत्यारोपाने विखारी रूप घेतलेली नेत्यांची भाषणबाजी आज सायंकाळी थांबली. मागील दोन आठवडे राज्याच्या निवडणूक आखाड्यात ‘आमचे व तुमचे’ असा सावत्रभाव रंगवत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचार सभांचे रूपांतर आरोपसभांमध्ये केल्याचे चित्र होते. त्यातच शिवसेना व भाजप नेत्यांमधली धारदार शब्दांची ‘दंगल’ लक्षवेधी ठरली होती. प्रचाराच्या या तोफा आज थंडावल्या. आता मंगळवारी २१ तारखेला मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील १० महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी हे मतदान होत असून, गुरुवारी (ता.

मुंबई - परस्परांवर शाब्दिक हल्ले व व्यक्तिगत ‘शालजोडी’ लगावत आरोप व प्रत्यारोपाने विखारी रूप घेतलेली नेत्यांची भाषणबाजी आज सायंकाळी थांबली. मागील दोन आठवडे राज्याच्या निवडणूक आखाड्यात ‘आमचे व तुमचे’ असा सावत्रभाव रंगवत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचार सभांचे रूपांतर आरोपसभांमध्ये केल्याचे चित्र होते. त्यातच शिवसेना व भाजप नेत्यांमधली धारदार शब्दांची ‘दंगल’ लक्षवेधी ठरली होती. प्रचाराच्या या तोफा आज थंडावल्या. आता मंगळवारी २१ तारखेला मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील १० महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी हे मतदान होत असून, गुरुवारी (ता. २३) मतमोजणी होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक शैली, तर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे भाजपच्या वर्मी सोडलेले ‘बाण’ प्रचारात मनभेदाची साक्ष देत होते. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या भवितव्याबाबत केलेले भाष्य तर अस्थिर राजकारणाची चाहूल देऊन गेले. पवार यांनीही मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करत प्रचारात रंगत निर्माण केली. 

कौरव, पांडव, अभिमन्यू, दुर्योधन व श्रीकृष्ण अशी महाभारतातली पात्रंही प्रचार सभांतून रंगवली. तर, शेवटी शेवटी वाघ, सिंह या पारंपरिक उपमांच्या सोबत ‘नरसिंह’देखील भाषणात अवतरले. 

गैरव्यवहार, बेनामी संपत्ती, बोगस कंपन्या असे ठेवणीतले आरोपदेखील नेत्यांनी केले. नोटाबंदीवरून पालिकेच्या आखाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रहार झाले. एकंदर निवडणूक महापालिका व जिल्हा परिषदांची असली, तरी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसादही नेत्यांच्या भाषणातून उमटले. अखेर प्रचाराची ही ‘दंगल’ आज संपली.

प्रचाराच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी रॅली, पदयात्रांनी धुरळा उडवून दिला. त्यामुळे रविवारी दिवसभर धामधुमीचे वातावरण होते. एकूण प्रचाराच्या रणधुमाळीवरून आता महापालिकेत सत्ता कोणाची येणार, याविषयींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराने मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपापला प्रभाग आणि गट चांगलाच पिंजून काढला. 

प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका करताना दाणादाण उडवून दिली. ‘गाजर गॅंग’, ‘भाजपची राष्ट्रवादी झाली’, भाजप निष्ठावंतांवर अन्याय, गुंडांना पक्षप्रवेश इथपासून ते शिवसेना- राष्ट्रवादीची छुपी युती, नेत्यांचे मॅचफिक्‍सिंग अशा एक न अनेक नव्या मुद्द्यांवरून नेत्यांनी वातारण तापवले होते. राजकीय आरोपांपासून व्यक्तिगत आरोपांपर्यंत ते एकमेकांची संपत्ती जाहीर करण्याचे आव्हान देण्यापर्यंत, सर्व आव्हाने आणि प्रतिआव्हाने देताना दिसत होते. 

राजकीय पक्षांनी कितीही आश्वासने दिली, आमिषे दाखवली, तरीही मतदार राजा त्याच्या मनात जे असते तेच करतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या १० महानगरपालिका निवडणुकीत कोण सत्ता राखणार आणि कुठे सत्तापरिवर्तन होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्या टप्प्यासाठी ६९ टक्के मतदारांनी हक्क बजावला. याही टप्प्यात विक्रमी मतदान होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: campaigning ended today